अरबी समुद्रावर जमणाऱ्या दमट वाऱ्यांनी वेग घेतल्याने यंदाचा नैऋत्य मान्सून वेळापत्रकापेक्षा चार‑पाच दिवस आधी केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने सोमवारी जारी केलेल्या अॅडव्हान्स अंदाजानुसार, पावसाळ्याची पहिली वळीव 27 मेच्या सुमारास येण्याची दाट शक्यता आहे. या तारखांमध्ये चार दिवस पुढे-मागे होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
साधारणतः 1 जूनला केरळमध्ये पाऊस दाखल होतो. गेल्या वर्षी तो 31 मे रोजी दाखल झाला होता. मात्र यंदा अंदमान‑निकोबारमध्ये 13 मे रोजीच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मान्सूनने वेळेच्या 10 दिवस आधी पहिले पाऊल टाकले आहे.
advertisement
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे हवामानशास्त्रज्ञ राजीवन एरिककुलम यांनी सांगितले की, अंदमानमध्ये लवकर सक्रिय झाल्यानंतर मान्सून दक्षिणेकडून श्रीलंकेकडे सरकला असून, 24 मे पर्यंत हवामानातील सर्व अनुकूल घटक, पश्चिमेकडील मजबुत वारे, 30 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले समुद्रपृष्ठ तापमान आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर तयार होणारी कमी‑दाबाचा पट्टा एकत्र येण्याची चिन्हे आहेत. या व्यवस्थेमुळे पावसाची मुख्य रेषा थोडी उत्तरेला वळण्याचा अंदाज असल्याने प्रारंभी कोझिकोड‑कासरगोडसारख्या उत्तर केरळच्या जिल्ह्यांत अधिक मुसळधार सरी बरसतील. तर तिरुअनंतपुरम्, कोल्लम् येथे तुलनेने मध्यम पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान तज्ज्ञांनी या हंगामात नेहमीच्या मान्सूनच्या पद्धतीत बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. पारंपारिकपणे, मान्सून दक्षिणेकडील प्रदेशात सुरू होतो. 15 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापण्यासाठी लाटांच्या स्वरूपात उत्तरेकडे सरकतो. मात्र, यावर्षी केरळच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात दक्षिणेकडील प्रदेशांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे
15 वर्षानंतर लवकर दाखल होणार मान्सून....
जर पावसाळा 27 मे किंवा त्याआधी सुरू झाला, तर गेल्या 15 वर्षातला सर्वात लवकर दाखल होणारा मान्सून असणार आहे. याआधी 2009 मध्ये 23 मे रोजी मान्सून दाखल झाला होता.
जून‑जुलैमध्ये एल‑निनो‑न्यूट्रल स्थिती राहिल्यास प्रदेशनिहाय पावसाचे घनत्व बदलू शकतो. कृषी विभागाने लवकर आगमनाची शक्यता पाहता शेतकऱ्यांना पेरणीचे कॅलेंडर लवचिक ठेवण्याचा सल्ला दिला आहे.