शिवसेना शिंदे गटाकडून आपल्या प्रचाराची पहिली सभा मुंबईत पार पडणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथील सभेला संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी शिवसेनेची पहिली प्रचार सभा कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी होणार आहे. मंगेश कुडाळकर यांनी शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. कुडाळकरांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. आता मुख्यमंत्री आमदार कुडाळकरांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यामुळे कुडाळकर यांना या निवडणुकीत मोठं आव्हान असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
अंधेरी पूर्वमध्ये दुसरी सभा...
कुर्ला येथील सभा पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंधेरी पूर्व येथील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. रात्री अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करणार आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघातील उमेदवार मुरजी पटेल हे भाजपचे आहेत. मात्र, निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अंधेरी पूर्वमध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या आमदार आहेत. पोटनिवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावरील त्या पहिल्या आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर हे पिछाडीवर होते. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही बाजूने जोर लावला आहे.
प्रचारासाठी मोजकेच दिवस...
सध्या दिवाळीची धामधूम असल्याने प्रचार थंडावला आहे. दिवाळी 3 नोव्हेंबरला संपत आहे, तर 4 नोव्हेंबर ही अर्ज माघारीची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर प्रचार 18 नोव्हेंबरला संपणार आहे. या कालावधीत केवळ 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला रविवार आला आहे.
