महाविकास आघाडीची मागील काही दिवसांपासून जागा वाटपावर चर्चा सुरू होती. अखेर मविआने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 85-85-85 असं जागा वाटप झाले असून १५ जागांवर तिढा असल्याचे सांगितले. तर इतर मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महाविकास आघाडीतील सहा छोट्या घटक पक्षांसाठी 18 जागा सोडण्याचे तीन पक्षांनी निश्चित केले आहे. यातील अधिक जागा मिळवण्यासाठी छोट्या पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस हे प्रमुख तीन पक्षांनी 288 पैकी 270 जागांवर आपले उमेदवार लढवणार आहे.
advertisement
घटक पक्षांची किती जागांची मागणी?
महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष यांना जागा सोडणार असल्याचे निश्चित केले आहे. या पक्षांसह इतर काही छोटे पक्ष आणि संघटना यांनी प्रागतिक पक्षांची आघाडी तयार केली आहे. या आघाडीने मविआकडे 38 जागांची मागणी केली आहे. मात्र, सुरुवातीच्या चर्चेनंतर प्रागतिक पक्षांच्या आघाडीने 20 जागांची मागणी केली आहे. यातील काही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सांगोलाच्या जागेवर शेकापचा आणि नाशिक पश्चिमवर माकपचा दावा आहे. या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाने उमेदवार दिले आहेत. शेकापने 4 ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. समाजवादीने 5 जागा जाहीर केल्या आहेत. माकपने 5 जागांची तयारी केली असून एका ठिकाणी त्यांचा विद्यमान आमदार आहे. मात्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र आहे.
मविआ कसं करणार जागा वाटप?
लोकसभेला या घटक पक्षांना मविआने एकही जागा सोडली नव्हती. विधानसभेला सन्मानजनक जागा देण्यात येतील, असा शब्द मविआने दिला होता. आता छोट्या पक्षांना जागा देण्यासाठी मविआतील प्रमुख तीन पक्षांच्या जागा वाटपाच्या सूत्रात बदल होण्याची शक्यता आहे. छोट्या पक्षांमध्ये शेकाप 6, समाजवादी 5, माकप 4, भाकप 1 आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष 1 असे या 18 जागांचे वाटप होण्याची शक्यता आहे.
मविआला फायदा काय?
या लहान पक्षांना जागा सोडल्याने मविआतील उमेदवारांना इतर जागांवर मतदानात फायदा होईल. त्याशिवाय, घटक पक्षांना सोडण्यात येणाऱ्या जागांवर त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे आघाडीचा एकच उमेदवार असल्याने या 18 जागांवर विजयाची शक्यता निर्माण होईल. त्यामुळे हरियाणा पॅटर्नला काही प्रमाणात निष्प्रभ करता येईल असे म्हटले जाते. या पक्षांना जागा सोडल्याने मविआ एकजूट असल्याचा संदेश लोकांपर्यंत जाईल. त्याचा फायदा मतदानांमध्ये होईल. त्याशिवाय हे घटक पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता शून्य असल्याने सत्ता स्थापन करण्यात आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतही मविआकडे एक ठोस संख्याबळ कायम राहिल, असा अंदाज आहे.
