इस्रोच्या अहवालातल्या माहितीनुसार, ग्लेशियल लेक्सचा विस्तार होत राहिला तर ते कधीही फुटू शकतात. त्यामुळे सखल भागात पूर येऊ शकतो आणि त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. काही वर्षांपूर्वी केदारनाथ, चमोली, सिक्कीममध्ये जसे जलप्रलय आले होते, तशीच स्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. म्हणजेच भविष्यात भारतावर आणखी नैसर्गिक संकटं येण्याचा धोका आहे.
हिमालयाच्या प्रदेशात तयार झालेल्या ग्लेशिअल लेक्सवर इस्रो सतत लक्ष ठेवते. इस्रो आपल्या उपग्रहांद्वारे त्यांचा अभ्यास करते, जेणेकरून कोणत्याही धोक्यापूर्वी प्रतिबंधाचा मार्ग शोधता येईल. इस्रोकडे 1984 ते 2023 या कालावधीतल्या ग्लेशिअल लेक्सचा डेटा आहे. या डेटाच्या अभ्यासातून असं निदर्शनास आलं आहे, की 1984पासून हिमालयातल्या 27 टक्क्यांहून अधिक ग्लेशिअल लेक्सचा लक्षणीय विस्तार झाला आहे. त्यापैकी 130 लेक्स भारताच्या सीमेत आहेत.
advertisement
इस्रोने 1984 ते 2023पर्यंतच्या डेटाचा अभ्यास केला आहे. यानंतर, इस्रोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे, की सॅटेलाइट फोटो ग्लेशिअल लेक्समधले महत्त्वपूर्ण बदल दर्शवतात. 2016-17मध्ये मार्क केलेल्या 10 हेक्टरपेक्षा मोठं क्षेत्रफळ असलेल्या 2431 तलावांपैकी 676 तलावांचा 1984पासून लक्षणीय विस्तार झाला आहे. 676 तलावांपैकी 601 तलावांचा दुपटीपेक्षा जास्त विस्तार झाला आहे. 10 तलावांचा विस्तार दीड पट ते दोन पटीने वाढला आहे, तर 65 तलावांचा विस्तार दीड पटीने वाढला आहे.
हिमालयातले ग्लेशिअल लेक्स भारतातल्या नद्यांचे मुख्य स्त्रोत आहेत. त्यांचा आकार झपाट्याने वाढत आहे. परिणामी ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्सचा (GLOFS) धोका वाढत आहे. इस्रोने म्हटलं आहे, की 676 ग्लेशिअल लेक्सपैकी 130 भारतात आहेत. त्यापैकी 65 सिंधू नदीच्या वर, सात गंगा नदीच्या वर आणि 58 ब्रह्मपुत्रा नदीच्या वर आहेत.