विधान भवनाच्या लॉबीत तुंबळ हाणामारी झाली. आमदार आणि मंत्री ज्या प्रवेशद्वारातून विधान भवनात प्रवेश करतात त्याच द्वारासमोर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाईची मोठी घोषणा केली.
गुरुवारी विधिमंडळात झालेल्या राड्याचे पडसाद आज सकाळी विधानसभेच्या कामकाजात उमटले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास प्रस्ताव सादर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, काल दोन अभ्यांगतांमध्ये मारामारी झाल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. विधानसभा समस्यांबाबत टीकाटिप्पणी झाली आहे. सभागृहात परिसरात ही घटना घडली. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना मी अहवाल सादर करायला सांगितले होते. त्या अहवालानुसार दिसून येते की काल सायंकाळी मुख्य पोर्चमध्ये दोन अभ्यांगतांमध्ये मारामारी झाली. सुरक्षा पथकाने तात्काळ ती थांबवली. त्यांची चौकशी केली असता नितिन देशमुख याने जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. तर टकले यांनी गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले.संबंधित व इतर 7 जणांविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
राड्यानंतर आता संसदेप्रमाणे विधिमंडळातही नीतीमूल्य समिती स्थापन करणार असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. आमदारांचे आचरण हे आदर्शवत असावे, असेही त्यांनी म्हटले.
विधानसभा अध्यक्षांची मोठी घोषणा...
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर आता विधानभवन परिसरात यापुढे इतर कोणालाही प्रवेश नसणार, याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. यापुढे मंत्री, आमदार शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही प्रवेश नसणार. त्याशिवाय, मंत्र्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची चर्चा, त्यांची सोडवणूक करण्यासाठी मंत्रालयातील दालनाचा वापर करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली.
राडेबाज कार्यकर्त्यांवर कारवाईचे आदेश...
आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित सर्जेराव बबन टकले (वय 37) आणि नितीन हिंदुराव देशमुख (वय 41) यांच्यावर फौजदारी कारवाईची घोषणा नार्वेकर यांनी केली. त्यांच्याविरुद्ध चौकशी करुन विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी विधानसभा विशेषाधिकार समितीकडे दोघांचे प्रकरण वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.