रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी शोक व्यक्त केला आहे. देशासाठी आणि देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने फक्त टाटा ग्रुपला नव्हे तर प्रत्येक भारतीयाला मोठा तोटा झाला आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने मी एक वैयक्तिक मित्र देखील गमावला आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर मला वेगळीच प्रेरणा आणि ऊर्जा मिळत गेली. त्यामुळे त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या नैतिक मूल्यांवरील माझा आदरही द्विगुणीत होत गेला.
advertisement
अत्यंत दूरदृष्टीचे उद्योजक आणि समाजसेवी असलेले रतन टाटा नेहमीच समाजाच्या भल्यासाठी धडपडत होते. रतन टाटा यांच्या जाण्याने देशाने आपला एक सहृदयी पुत्र गमावला आहे. रतन टाटा यांनी भारताचे नाव साऱ्या जगात नेले आणि साऱ्या जगातील जे जे सर्वोत्तम ते ते भारतात आणले. त्यांनी १९९१ मध्ये टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर समूहाला किमान 70 पटीने वाढवले.
रिलायन्स उद्योग समूह, नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबीयांतर्फे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत असून टाटा कुटुंबिय आणि टाटा समूह यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. रतनजी तुमच्या स्मृती नेहमीच माझ्या हृदयात कायम राहतील.