सगळ्यांना हसवणारा अरुण सोडून गेला, घरात आढळला रीलस्टारचा मृतदेह, छ.संभाजीनगर हळहळलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रसिद्ध रील स्टार त्याच्या राहत्या घरात तो मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात तसेच सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 26 वर्षांच्या अरुणच्या अकाली निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
advertisement
1/7

छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपे याचे आज (मंगळवार, 10 मार्च) सकाळी निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील बालाजीनगर येथील त्याच्या राहत्या घरात तो मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात तसेच सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 26 वर्षांच्या अरुणच्या अकाली निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
advertisement
2/7
अरुण तुपे हा सोशल मीडियावर कोण अरुण तुपे या नावाने ओळखले जात होता. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो कॉमेडी, इमोशनल आणि विविध प्रकारच्या अभिनयप्रधान रील्स पोस्ट करत असे. त्याच्या अभिनय कौशल्यामुळे आणि वेगळ्या शैलीमुळे त्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली होती. इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे 179 हजार (179K) फॉलोअर्स होते आणि विशेषतः तरुणवर्गात तो खूप लोकप्रिय होता . त्याच्या रील्सला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत असत.
advertisement
3/7
विशेष म्हणजे, काल रात्रीदेखील अरुण याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर काही तासांतच त्याच्या निधनाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या निधनाची माहिती समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्या निधनानंतर त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.
advertisement
4/7
अरुण तुपे याने BAMCJ (Bachelor of Arts in Mass Communication and Journalism) चे शिक्षण घेतले होते. अभिनय आणि कंटेंट क्रिएशनची आवड जोपासत त्याने सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. विशेष म्हणजे, अरुण आपल्या आईसोबतही मजेशीर आणि हसवणाऱ्या रील्स बनवत असे. आई-मुलाच्या या रील्सना नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत होती.
advertisement
5/7
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण तुपे याचे त्याच्या राहत्या घरात अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले.
advertisement
6/7
सध्या त्याचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती मिळत आहे.
advertisement
7/7
दरम्यान, अरुण तुपे याच्यावर आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील नरला येथील त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अवघ्या 26 व्या वर्षी सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अरुण तुपे याच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सगळ्यांना हसवणारा अरुण सोडून गेला, घरात आढळला रीलस्टारचा मृतदेह, छ.संभाजीनगर हळहळलं