सांगली: महाराष्ट्र - कर्नाटकमध्ये साखर कारखान्यांचा यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस तोडणीसाठी मराठवाडा, विदर्भासह माणदेशातील कामगारही कारखाना परिसरात दाखल झाले आहेत. हे स्थलांतरित ऊस कामगार मतदानासाठी गावी परतणार का? काय नियोजन आहे? याविषयी लोकल18च्या प्रतिनिधींनी ऊस कामगार मजुरांशी संवाद साधला. तेव्हा वालेकर कुटुंबाने त्यांच्या जत मतदार संघातील समस्यांचा पाढा वाचला. तसेच तिकडं रोजगार नसल्यानं पोट भरण्यासाठी आम्ही दूर आलो आहोत. आमदार निवडून त्यांना मुंबईला पाठवण्यासाठी स्वतःच्या खर्चानं का जावं? असा प्रश्न स्थलांतरित कामगारांनी उपस्थित केला आहे.
advertisement
माणदेशातून ऊस क्षेत्रात स्थलांतरित झालेले तरुण बेरोजगार बिराप्पा वालेकर हे बेरोजगारीच्या समस्येबद्दल बोलले. परमनंट नोकर भरती नाही मग शिकून उपयोग काय? असं त्यांचं म्हणणं होतं. "शेतीवाडी करून जगावं म्हटलं तर शेतीला द्यायला पाणीही नाही, यामुळेच आम्हाला पोट भरण्यासाठी गाव सोडून दूर यावं लागतं. चारच दिवसांपूर्वी आम्ही कारखाना परिसरात आलोय". इतक्या थंडी- वाऱ्यात आता मतदानासाठी परत जाणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. “आत्तापर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फोन आला नाही. त्यांनी मतदानासाठी बोलावलं आणि ने-आण करण्याची व्यवस्था केली. तरच आम्ही मतदानाला जाऊ, अन्यथा इथेच ऊस तोडत राहू' असेही त्यांनी सांगितलं.
यंदा महाराष्ट्रात कुणाचं सरकार? जनता एकालाही देणार नाही बहुमत, राजकीय विश्लेषक असं का म्हणाले?
फक्त मतदानापुरतं आम्ही दिसतो का?
खूप शिकूनही आपल्या मुलाला परमनंट नोकरी नसल्याचं दुःख निंब्यावा वालेकर यांनी व्यक्त केलं. सुशिक्षित मुलांनाही आपल्यासारखंच ऊस तोडीचे काम करून जगावं लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘पाणी, पाणी’ म्हणून कित्येक पिढ्या गेल्या. पण आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांना कर्नाटक सीमाभागात असणाऱ्या आमच्या गावाला पाणी दिले नाही. फक्त मतदानापुरतेच सगळ्या साहेबांना आम्ही दिसतो. मतदानाचा दिवस झाला की आमच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दुःख त्यांनी लोकल18 सोबत बोलताना व्यक्त केले. पोट भरण्यासाठी गाव सोडून आम्ही दूर आलोय. साहेबांना आमदार करून मुंबईला पाठवण्यासाठी का मतदान करावं ? आपल्या प्रश्नांकडे कधीच न पाहणाऱ्या राजकीय पुढार्यांना मतदान करण्यासाठी स्वत:च्या खर्चाने गावाकडे जाण्याची इच्छा नसल्याचे वालेकर कुटुंबाने सांगितले.
महायुती की महाविकास आघाडी, पुणेकरांचे विचार काय? तुळशीबागेत निवडणुकीची रंगली चर्चा
जगण्याचे प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा दुष्काळ
लोकल 18च्या प्रतिनिधींशी संवाद साधलेले हे वालेकर कुटुंब मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातले आहेत. कर्नाटक सीमाभागात असणाऱ्या बहुचर्चित जत मतदारसंघाचे पाण्याविना तळमळणारे हेच ते मतदार आहेत. ऊसतोड कामगारांची हजारो मते बुडू नयेत, यासाठी त्यांना गावाकडे ने-आण करण्याचा खटाटोप करणारे राजकीय उमेदवार आपण या आधीच्या निवडणुकांमध्येही पाहिले आहेत. परंतु, त्यांच्या जगण्याचा मूळ प्रश्न सोडवणाऱ्या लोकप्रतिनिधींचा इकडे पाण्यासारखाच दुष्काळ दिसतो आहे. या स्थलांतरित मजुरांच्या समस्यांची चिंता नसणाऱ्या पुढार्यांना त्यांच्या मतदानाची किती चिंता आहे? आणि मतदार संघाबाहेर स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कार्यकर्ते किती झटतील? यावरच विदर्भ, मराठवाड्यासह माणदेशातील निवडणुकांचे निकाल ठरणार आहेत.