सांगली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकीचे ठरवत राज्यात पूर्ण बहुमताने महायुतीची सत्ता आली आहे. अनेकांनी या निकालाचं वर्णन अनपेक्षित असंच केलं आहे. यावर जनतेतूनही प्रतिक्रिया उमटत असून सांगलीतील मतदारांनी महायुतीचा विजय कसा झाला? आणि महाविकास आघाडीचं नेमकं काय चुकलं? याबाबत लोकल18 सोबत बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
"लाडकी बहिण योजनेमुळे, तसेच वीज बिल माफी सारख्या निर्णयामुळे महायुतीचा फायदा झाला. निवडणुकांना पुढे ठेवत महायुतीने घेतलेले निर्णय त्यांच्या फायद्याचे ठरले. तर महाविकास आघाडी आपापसामध्ये मतभेद निर्माण करण्यात गुंतली असल्याने बेसावध राहिली. याचाच फटका त्यांना निवडणुकीमध्ये बसलेला दिसत आहे. जागावाटप, बंडखोरी आणि मताची विभागणी याचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचे दिसते. याउलट महायुतीमध्ये एकी असल्याचे दिसून आले. एकीच्या बळामुळेच महायुतीला दणदणीत विजय मिळवता आला, असं कुंडल येथील व्ही. वाय. लाड यांनी सांगितले.
‘…हे धोरण अवलंबलं म्हणूनच विजयी’, रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांचा विजयानंतर जल्लोष
आता सर्वसामान्यांसाठी काम करावं
सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत अपायकारक निकाल असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांवरील अन्याय, तरुणांमधील बेरोजगारी तसेच महागाई सारखे प्रश्न आणखी गंभीर होतील असेही काहींना वाटते आहे. सर्वसामान्य जनतेला येत्या काही दिवसातच कळेल की आपण चूक केले की बरोबर?" अशी प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत. तर "महायुती सत्तेत येत आहे. तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी योग्य निर्णय घ्यावेत. आपले वर्चस्व सिद्ध करावे," अशी अपेक्षा तरुण नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीनं दणदणीत विजय मिळवला असून महाविकास आघाडीला 50 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर महायुतीनं 234 जागांवर बाजी मारलीये. यात भाजप 132, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागांवर विजय मिळवला आहे.





