TRENDING:

Pratap Sarnaik On Raj Thackeray : ज्यांच्या नावाने छाती बडवून राज बाहेर पडले, त्यांच्याच कडेवर बसले', सरनाईकांनी मनातलं सांगितलं

Last Updated:

Pratap Sarnaik On Uddhav Thackeray and Raj Thackeray : ज्यांच्या नावाने छाती बडवून राज बाहेर पडले, त्यांच्याच कडेवर बसले असल्याची बोचरी टीका सरनाईकांनी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मराठी विजय मेळाव्यात उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे राजकीय मनोमिलन झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात आगामी निवडणुकीत युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर, मेळाव्यातील टीकेनंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपने दोन्ही पक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.  भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे विरोधात आज टीकास्त्र सोडले. त्यानंतर आता, राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित 'मन की बात' सांगितली आहे. ज्यांच्या नावाने छाती बडवून राज बाहेर पडले, त्यांच्याच कडेवर बसले असल्याची बोचरी टीका सरनाईकांनी केली आहे.
छाती बडवून राज बाहेर पडले, त्याच बडव्यांच्या कडेवर बसले, सरनाईकांनी मनातलं सगळं बाहेर काढलं
छाती बडवून राज बाहेर पडले, त्याच बडव्यांच्या कडेवर बसले, सरनाईकांनी मनातलं सगळं बाहेर काढलं
advertisement

मराठी विजय मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारच्या मराठी विरोधी भूमिकेवर हल्लबोल केला. तर, उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरा वार केला. गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे , त्यामुळे या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या, असं प्रताप सरनाईक एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले.

advertisement

मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असे उबाठा गट , मनसे सांगत आहेत. मग काही वर्षांपूर्वी हे लोक वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचे प्रेम नाही, केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे. राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे. यांचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचे सरनाईकांनी म्हटले.

advertisement

प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेना लिहिलेलं पत्र...

प्रति,

माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब

शिवसेना मुख्य नेते

उप मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य

जय महाराष्ट्र !

आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरु आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या , आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे. पण आपल्या राज्यात , गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे , त्यामुळे या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या.

advertisement

मराठीच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत असे उबाठा गट , मनसे सांगत आहेत. मग काही वर्षांपूर्वी हे लोक वेगळे कोणाच्या हितासाठी झाले होते? मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांच्याविषयी त्यांना काडीचे प्रेम नाही, केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून ही मंडळी एकत्र येत आहेत हे सुज्ञ जनता ओळखून आहे. राक्षसाचा जीव पोपटात असतो अशी एक लोककथा मराठीत आहे. यांचा जीव महापालिकेत अडकलेला आहे. महापालिकेच्या तिजोरीत यांचा आत्मा आहे. शनिवारी वरळी येथे झालेल्या मेळाव्यात सुद्धा त्यांचा स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडाच पहायला मिळाला. सत्ता गेल्यामुळे ते किती अगतीक झाले आहेत याची प्रचिती उभ्या महाराष्ट्राला पदोपदी येत आहे. उबाठाचे राजकारण अत्यंत खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी आहे. त्यामुळेच त्यांचा एक एक सहकारी त्यामुळेच त्यांना सोडून जात आहे.

advertisement

'मराठी'ची टोपी घालून, अनेक वर्षे ऊबाठा गटाने मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली. परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले. त्यांच्या या टोपीखाली दडलंय काय ? तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा दडलेला आहे. कोविड रुग्णांची खिचडी खाऊन गब्बर झालेली ही मंडळी मिठी नदीतील भ्रष्टाचाराच्या गाळात हे खोलवर अडकून पडली आहेत. मराठी भाषेचे कैवारी किंवा ठेकेदार असल्याचा आव आणणारांनी मराठीचे जेवढे नुकसान केले तेवढे कुणीच केले नसेल. गेली अनेक वर्षे फक्त भाषेच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्यांनी “मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करणार”, “मुंबई तोडण्याचा डाव” असा अपप्रचार करून वर्षानुवर्षे लोकांची मते लाटली. प्रत्यक्षात मुंबईचा नाही तर फक्त स्वतःचाच विकास ‘उबाठा’ने केला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणीच करणार नाही हे यांना चांगलेच माहिती आहे, परतुं तरीही ते दरवेळी बागुबलबुवा उभा करतात. ‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’ असा हा प्रकार आहे. लोकांना खोटी भीती दाखवयाची आणि स्वतः ‘गब्बर’ होऊन ‘गबर’ व्हायचे, असे यांचे धोरण आहे.

आयुष्यभर मराठीवर राजकारण करणारे हे नेते मुंबईत एवढी वर्षे सत्ता असून मराठी शाळा वाचवू शकले नाहीत. उलट उबाठाच्या काळात महापालिकेच्या मराठी शाळांचे रूपांतर इंग्रजी शाळांमध्ये करण्यात आले आणि मराठीला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. “दुकानांवरच्या पाट्या मराठीत लावाव्यात” म्हणून आंदोलन करणाऱ्यांच्या मुलांच्या साखरपुड्याच्या-लग्नाच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजीत छापल्या जातात हे सगळ्यांनीच उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. मुंबईतील 'गिरणी कामगार' देशोधडीला लागला…तो कोणामुळे ? मराठी माणुस मुंबई सोडुन विरार, नालासोपारा, बदलापुरला शिफ्ट झाला, तो कोणामुळे ? मताची भीक मागण्यासाठी इतर भाषिकांचे मेळावे कोणी घेतले ? तिसरी भाषा शिकविण्याचा प्रस्ताव कोणाच्या सत्तेच्या काळात आला हेही लोक जाणून आहेत. मराठी माणसाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी , मराठीचा झेंडा चहू दिशांनी फडकावा असे आपल्याला प्रत्येकाला वाटते. पण उबाठाचे पक्षावर एक हाती वर्चस्व असतानाच मुंबईतील हॉटेल इंडस्ट्री, बांधकाम व्यवसाय , सोन्या चांदीची दुकाने यासह प्रत्येक क्षेत्रात , उद्योग व्यवसायातून मराठी माणूस हद्दपार होत गेला. भाषेचे राजकारण करणाऱ्यांनी लोकांच्या विकासाचा विचार कधीच केला नाही. चाकरमानी हे आपले चाकर आहेत अशाच भ्रमात ते राहिले. अनेक वर्षे उबाठाची सत्ता महापालिकेत होती, तेव्हा त्यांनी यासाठी काय केले ? यावर एक ‘पश्चाताप मेळावा’ घेऊन ‘उबाठा’ने जनतेला माहिती दिली पाहिजे.

'मराठीचा मुद्दा' घेऊन, राज ठाकरेंनी 2006 मध्ये 'मनसे' ची स्थापना केली त्याला आता 19 वर्ष झाली ..!! मराठीची परिस्थिती तीच आहे उलट अजुन बिकटच झाली आहे! ज्या बडव्यांच्या नावाने छाती बडवून राज ठाकरे रुसून घराबाहेर पडले होते, त्याच बडव्यांच्या कडेवर आज ते बसत आहेत. त्यामागे कोणते राजकारण आहे हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता दुधखूळी नक्कीच नाही. आपल्याला भाषणाला टाळ्या पडतात परतुं मते पडत नाहीत ती का, याचा विचार करुन ते थकले आणि बडव्यांना शरण गेले, असे आम्ही म्हणायचे का ? मराठी माणसांबद्दल एवढे प्रेम होते तर का नाही उबाठा आणि मनसेच्या प्रमुखांनी मराठी तरुणांना व्यवसायात उतरण्यासाठी मार्गदर्शन केले ? स्थानिय लोकाधिकार समिती पुन्हा एकदा जोरात कार्यरत का नाही केली? मराठी तरुणांनी रस्त्यावर उतरायचे, फक्त आंदोलने करायची आणि यांनी एसीत बसून खिडकीतून मजा पाहायची, हेच यांचे मराठी प्रेम आहे.

वास्तव हे आहे की 'मराठी तरुण कामधंद्याला लागणं' हे उबाठा आणि मनसे या दोनही पक्षांना परवडणारं नाही. मराठी तरुणांच्या हातांना काम मिळालं तर यांची दुकानं बदं होतील. आजचा मराठी तरुण नक्की करतोय काय ..?? त्याला काय हवे आहे याच्याशी या नेत्याना देणे घेणे उरलेले नाही आणि कधीही देणे घेणे नव्हते. मराठी तरुणांची माथा भडकवून, त्यांचा वापर करुन, या दोन पक्षाचे नेते आपले स्वतःचे दुकान चालवत आहेत. या दुकांनाचे शटर बंद व्हायची वेळ आली म्हणून हे पुन्हा एकत्र येत आहेत. यांचे मराठी प्रेम हे पुतना मावशीचे मराठी प्रेम आहे. यांना फुटलेला मराठी प्रेमाचा पान्हा हा स्वार्थाच्या वीषाचा आहे. आपली अमृताहून गोड मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली गेली पाहिजे , मराठी भाषेचा जागर झालाच पाहिजे आणि हा जागर होणारच. पण त्याचा स्वतःच्या राजकारणासाठी , स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग करणे योग्य नाही. एकमेकांना ज्यांनी गेली दोन दशके सतत पाण्यात पाहिले ते आता एकमेकांना स्टेजवर शेजारी शेजारी पाहात आहेत तेंव्हा ते मनात एकमेकांची उणी दुणी काढत असतील. एकमेकांना सोबत घेऊन भाषेचे राजकारण करण्याशिवाय काही पर्याय त्यांच्याकडे उरलेला नाही !

मुंबईतील मराठी माणसाच्या मनात आज काही प्रश्र्न आहेत. “मराठी-मराठी” करून ..अनेक पिढ्या बसून खातील, एवढी माया उबाठा गटाच्या लोकांनी गोळा केली त्याच काळात बहुसंख्य मराठी माणूस गाठोडे काखेत घेऊन मुंबईतून हद्दपार होत होता. तेव्हा यांनी डोळे बंद केले होते का ? मुंबईत सत्ता उपभोगली त्यांनी मुंबईसाठी काय केले ? त्यांच्या सत्ता काळात किती मराठी तरुणांना व्यावसायिक बनवले ? व्यवसाय रोजगारासाठी किती लोकांना मार्गदर्शन केले ? किती लोकांच्या आयुष्याला दिशा दिली ? यांच्या बेगडी भाषा प्रेमाला, स्वार्थी राजकारणाला आणि खोटारडेपमाला मुंबईची जनता कंटाळली आहे. सर्वसामान्य मुंबईकर विकासाच्या राजकारणाला साथ देत आहे.

गेल्या ३ वर्षांच्या काळात आपण शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री म्हणून आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या कामाने महाराष्ट्राच्या, मराठी माणसांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा - वसा व महाराष्ट्र धर्माचे कार्य शिंदे साहेब, आपण पुढे नेत आहात. मराठी हा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे पण त्याचवेळी सर्वसामान्य मराठी माणसाला न्याय देण्याचे , मुंबई महाराष्ट्राच्या विकासाला सुपरफास्ट गती देण्याचे काम आपण मुख्यमंत्री असताना वेगाने सुरू केले. मुंबईतील कोस्टल रोड, भुयारी मेट्रो , मोठमोठे हायवे, राज्यातील मोठमोठे विकास प्रकल्प जनतेच्या डोळ्यासमोर आहेत.

मराठी भाषेला “अभिजात भाषेचा” दर्जा देण्यासाठी आपण आदरणीय नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकारकडे जाऊन स्वतः प्रयत्न केले, हे खरे मराठी भाषेवरील प्रेम आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निधी आपल्याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढला. विश्व मराठी साहित्य संमेलन आपणच सुरू केले. 'जय जय महाराष्ट्र माझा' या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णयही आपणच घेतलात. महाराष्ट्रात आपण शिवसेना पक्ष आणि सरकारच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली आहेत म्हणूनच विधानसभा निवडणुकीत मराठी मनाने आपल्या सामर्थ्यशाली नेतृत्त्वावर विजयाची मोहोर उठवली आणि शिवसेना पक्षाचे 60 आमदार विजयी झाले. कुठे भूकंप येवो की महापूर…कोणतीही आपत्ती आली किंवा नैसर्गिक संकट….कोणत्याही स्थितीत लोकांच्या मदतीसाठी धाऊन जाणारा, ग्राऊंड लेव्हलवर उतरुन सामान्य लोकांसाठी काम करणारा एकच नेता आहे ….ते आपणच आहात. पहेलगाम येथे अडकलेल्या मराठी पर्यटकांच्या मदतीसाठी काश्मीरमध्ये पोहोचणारे पहिले मराठी नेते आपणच. केरळ असो की काश्मीर , किंवा देशात कुठेही अडचणीत असलेल्या मराठी माणसाच्या मदतीसाठी आपण सर्व प्रथम धाव घेता हे कुणीही विसरणार नाही.

महाराष्ट्र राज्यात विकासकामे करत असताना प्रत्येक गरजू नागरिकाला सरकारी वैद्यकीय मदत देण्यासाठी आपली असलेली तळमळ प्रत्येकाने पाहिली आहे. शेतकरी , तरुण , कामगार, ज्येष्ठ नागरिक प्रत्येक समाज घटकासाठी आपण काम केले आणि करीत आहात. 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेचा लाभ देत आपण त्यांचे लाडके भाऊ बनलात. एसटीचे रुपडे बदलत आहे .एसटी प्रवासात महिला , ज्येष्ठ नागरिकांना सवलत आणि लाभ मिळतोच आहे. आपली अनेक कामे जनतेला भावली आहेत , केवळ बंगल्यावर बसून राजकारण करणारे नाही तर 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस लोकांमध्ये मिसळून लोकांच्या भल्याचे निर्णय घेणारा एक नेता ….जमिनीवरील कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आज संपूर्ण देशाला झाली आहे. “काम करणारा आपला माणूस” , सत्तेत असूनही “कॉमन मॅन” सारखाच वागणारा - त्यांच्यात मिसळणारा असा नेता एकच म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हीच सामान्य जनतेची भावना आहे. आपल्या कामाने आपण खऱ्या अर्थाने “मराठी माणसाचे हृदयसम्राट” बनले आहात हे यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

शिंदे साहेब , वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य आपणच पुढे नेत आहात. स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता, जिवाची पर्वा न करता आपण लोकासाठी काम करीत आहात. मी गेल्या 30 वर्षांपासून आपला सहकारी म्हणून आपल्यासोबत काम करीत असताना मला आणि आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो. आपले नेतृत्व, कर्तृत्व आणि आपली काम करण्याची कार्यपद्धती यामुळे आज लाखो लोक आपल्या सोबत आणखी जोडले जात आहेत. आपल्याकडे येण्याचा ओघ सुरु आहे. आपले कार्य असेच सुरू ठेवा. महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी मन आपल्याच सोबत आहे !

धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब !!

आपला स्नेहांकित,

प्रताप सरनाईक

मराठी बातम्या/Politics/
Pratap Sarnaik On Raj Thackeray : ज्यांच्या नावाने छाती बडवून राज बाहेर पडले, त्यांच्याच कडेवर बसले', सरनाईकांनी मनातलं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल