आम्ही नाही तर ते स्वतःहून एकटे पडलेत : रोहित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकटं पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच श्रीनिवास पवार यांनीही अजितदादांवर टीका केली. यावर आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं. शरद पवार यांना सोडून जाणं योग्य नव्हतं ही भूमिका श्रीनिवास पवार यांनी दाखवून दिली. महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचेही हेच मत असल्याची प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. अजित पवार यांना पवार कुटुंबीयांनी एकट पाडलं नाही तर अजित पवार स्वतःहून एकटे पडल्याचेही रोहित पवार म्हणाले.
advertisement
अमोल मिटकरींवर रोहित पवारांची खोचक टीका
श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी टीका करत श्रीवास पवार यांना पुत्राचा मोह झाला असल्याचे विधान केले होते. मात्र, त्या व्यक्तीची लायकी लोकांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून वेळ वाया घालवणार नाही अशी खोचक टीका रोहित पवार यांनी अमोल मिटकरीं वर केली आहे.
वाचा - शिवसेना-राष्ट्रवादी कुणामुळे फुटली? अमित शह स्पष्ट बोलले, म्हणाले पुत्र-पुत्रीच्या मोहात..
जळगाव रावेर लोकसभेतील भाजपचे उमेदवार बदलण्याची चर्चा : पवार
जळगाव रावेर लोकसभेतील भाजपचे उमेदवार बदलण्याची चर्चा सुरू झालेली आहे. भाजपचे निर्णय केंद्रातून घेतले जातात व ते राज्याला स्वीकारावे लागतात. त्यामुळे राज्यातील नेत्यांनाच केंद्राच्या नेत्यांसमोर काही बोलता येत नाही. तर जिल्ह्याचे नेते काय बोलणार? असा टोला रोहित पवार यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. तर भाजप हा हुकूमशाही पाळणारा पक्ष असून केंद्रातून एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलला जात नसून महाराष्ट्रात कुठलाही निर्णय होत नसून सगळ्या गोष्टीसाठी दिल्लीला जावे लागते व दिल्लीतून निर्णय बदलले जातात, अशी प्रतिक्रिया ही रोहित पवार यांनी दिली आहे.
मनसे भाजपची युती होणार असल्याची चर्चा असून त्यासाठी राज ठाकरे हे दोन दिवसापासून दिल्लीत आहेत. मात्र, राज ठाकरेंनी युवकांची भूमिका घेऊन भाजप विरोधात लढल्यास ते जास्त योग्य ठरू शकते असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. तर राज ठाकरेंनी नेहमी मराठी अस्मिता जपली असून केंद्रात भाजप सरकार आलं तेव्हापासून महाराष्ट्राचं महत्त्व कमी करून गुजरातचं वाढवलं जात आहे. ते स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून आम्हाला ते पटत नाही. तसेच राज ठाकरे मराठी स्वाभिमानी आहेत. ते भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेणार नसल्याचा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीसोबत येण्याचा राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा असेही रोहित पवार म्हणाले.
