सांगली: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीनं वातावरण चांगलंच तापलंय. सांगली जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील अधिक लक्षवेधी ठरलेल्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे खानापूर-आटपाडी मतदारसंघ. इथे शिंदे सेनेकडून दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर तर महाविकास आघाडीकडून वैभव सदाशिव पाटील निवडणूक लढवत आहेत. यातच राजेंद्र अण्णा देशमुख यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने इथली लढत तिरंगी झाली आहे. सांगलीच्या खानापूर-आटपाडी मतदारसंघातील मतदारांनी लोकल18 सोबत बोलताना कुणाची हवा आहे? हे सांगितलंय.
advertisement
वैभव पाटील यांना पसंती
वैभव पाटील यांनी गावागावातील तरुणांना रोजगार दिला आहे. त्यामुळे आम्ही युवा पिढी वैभव दादांना साथ देणार आहोत, असे मतदार तुषार शिंदे म्हणतात. तर आमच्या सर्व युवक कार्यकर्त्यांची वैभव दादांना पसंती आहे. यामागचं कारण म्हणजे आमच्या मतदारसंघात प्रमुख चार समस्या आहेत. यामध्ये पाणी, रोजगार, आरोग्य आणि शिक्षण या चारही क्षेत्रांमध्ये वैभव दादांनी काम केलंय, असं सागर सूर्यवंशी सांगतात. तसेच मतदार संघात मेडिकल कॉलेज निघत आहे. त्यासाठी वैभव पाटील यांचं योगदान आहे. पुढील पाच वर्षांतही ते लोकांसाठी सोयी-सविदा आणतील. त्यामुळे त्यांना मतदारांची पसंती असेल, असं सदाशिव शिंदे म्हणतात.
मतदान करा, 20 टक्के सवलत मिळवा, कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी लढवली शक्कल!
अनिल बाबर यांचं काम मोठं
"माझ्या मते गेल्या दहा वर्षांमध्ये माजी आमदार अनिल बाबर यांनी खानापूर-आटपाडी मतदारसंघासाठी भरपूर काम केले आहे. विशेषत: त्यांनी इथल्या दुष्काळी भागातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेले टेंभू योजनेचे काम जनता कधीच विसरणार नाही. शिवाय माजी आमदार अनिल बाबर यांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र सुहासभैया यांच्यापाठी जनतेची सहानुभूती आहे. त्यामुळे सुहास भैयाचं खानापूर-आटपाडीचे नवे आमदार असतील, असं मतदार शेखर कदम म्हणतात.
बाबर-पाटील पारंपरिक प्रतिस्पर्धी
बाबर आणि पाटील दोन्ही कुटुंबांची पारंपारिक लढाई यापूर्वीही लक्षवेधी ठरली आहे. आता दोन्ही कुटुंबांचे वारस एकमेकांसमोर पहिल्यांदाच उभे आहेत. पहिल्याच प्रयत्नात विजयाचा षटकार ठोकण्यासाठी दोघेही सज्ज आहेत. इथे तिरंगी लढत होत असली तरी मतदारांमधून चर्चा मात्र दादा की भैया याचीच होतेय.





