पुणे : भारतामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवरच्या कारवाईचा बडगा आणखी कठोर झाला आहे. पुणे शहरात अवैधरित्या राहणाऱ्या 23 बांगलादेशी नागरिकांना भारत-बांगलादेश सीमेवर सोडून देण्यात आलं आहे. भारतीय वायूसेनेच्या विमानाने या बांगलादेशी नागरिकांना पश्चिम बंगाल येथील बागडोग्रा बॉर्डरवर सोडून देण्यात आलं आहे, अशी माहिती पुणे शहराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मदने यांनी दिली आहे.
advertisement
याआधी 22 जुलैला 16 बांगलादेशी नागरिकांची पुण्यातून हकालपट्टी करून त्यांना बॉर्डरवर सोडण्यात आलं होतं, ज्यात 8 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश होता. याआधी 16 जुलैला पुणे पोलिसांनी बुधवार पेठ, शुक्रवार पेठ आणि आंबेगावमध्ये ऑपरेशन करत अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं. क्राईम ब्रांच, स्पेशल ब्रांच, पाच प्रादेशिक विभाग आणि स्थानिक पोलीस स्टेशनने हे ऑपरेशन राबवलं होतं.
बनावट ओळखपत्र बनवली
तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुण्याच्या रेड लाईड एरियामध्ये बांगलादेशी महिला सापडल्या होत्या. बुधवार पेठेत अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी महिलांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. बांगलादेशी महिला भारतात अनधिकृतपणे प्रवेश करून पुण्यात वेश्या व्यवसायात स्वखुशीने सहभागी होत असल्याचे समोर आले. त्यांनी भारतात अनधिकृत प्रवेश करून बनावट ओळखपत्र मिळवली होती. फरासखाना ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी तपास पथक आणि अँटी-टेररिस्ट सेल यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली होती. या महिलांनी पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याचे खोटे भासवून रेड लाइट एरियामध्ये वेश्या व्यवसाय सुरू केला होता.
2020 ते 2024 या काळात फक्त 8 बांगलादेशी नागरिकांचं प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. पण यावर्षी मात्र यंत्रणांकडून अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. याआधी मुंबईमधूनही अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचं प्रत्यार्पण करण्यात आलं होतं.
पुण्यातून झालेलं बांगलादेशींचं प्रत्यार्पण
2020- 1 बांगलादेशीचं प्रत्यार्पण
2021- 2 बांगलादेशींचं प्रत्यार्पण
2022- 2 बांगलादेशी नागरिकांचं प्रत्यार्पण
2023- एकही नाही
2024- 3 बांगलादेशींचं प्रत्यार्पण