राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) साकारत असलेला रिंगरोड पुरंदर, हवेली, खेड, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील गावांमधून जाणार आहे. त्यामुळे त्या गावांचा विकास करण्यासाठी एमएसआरडीसीच्या अखत्यारीत काही गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यापूर्वी पीएमआरच्या अखत्यारीत जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील सुमारे 814 गावांचा समावेश करण्यात आला होता. आता त्याचा विस्तार टप्प्याटप्प्याने होत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी पुरंदर तालुक्यातील 37 गावे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात तर उर्वरित गावे प्राधिकरणाच्या बाहेर होती.
advertisement
पुरंदर तालुक्यात एकूण 104 महसुली गावे आहेत तसेच दोन आणि वर्ग नगरपालिका आहेत. तालुक्यात
आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग, रिंगरोड आणि आयटी पार्क असे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. तालुक्यात जेजुरीचे खंडोबा मंदिर, पुरंदर किल्ला, नारायणपूरचे दत्त मंदिर, केतकावळे येथील प्रतिबालाजी मंदिर, वीर आणि कोडीत येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, भुलेश्वर मंदिर अशी तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनक्षेत्रांचा समावेश आहे.
पुणे शहरातील समाविष्ट गावांमध्ये ज्या पद्धतीने नियोजनाअभावी बकालपणा वाढला, तशी स्थिती पुरंदर तालुक्यात निर्माण होऊ नये. पुरंदर तालुक्यातील गावांचा नियोजनबद्ध विकास व्हावा, तसेच एकाच नियोजन प्राधिकरणाच्या छताखाली सर्व तालुका आणला जावा, अशी मागणी आमदार विजय शिवतारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. याबाबत पीएमआरडीएने सरकारला सकारात्मक अहवाल पाठवला असून, सर्व गावे पीएमआरडीएच्या अखत्यारीत आणण्यासाठी नगरविकास विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
तालुक्यातील रस्ते, सांडपाणी व्यवस्था अन्य पायाभूत सुविधांचा नियोजनबद्ध विकास करणे शक्य होईल. सर्व प्रमुख रस्ते, सर्व गावांना जोडणारे रस्ते, वाड्या वस्त्यांवर जाणारे रस्ते आणि गावांतर्गत रस्ते अशा सर्व रस्त्यांचा भविष्यात चेहरामोहरा बदलेल. सध्या पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये विमानतळ प्रस्तावित आहे. विमानतळाला जाण्यासाठी पुणे शहरातून मेट्रो पुढे नेण्याचे नियोजन आहे.
कोणती गावे होणार समाविष्ट?
आंबळे, आंबोडी, बांदलवाडी, बेलसर, भोसलेवाडी, चिव्हेवाडी, दावणेवाडी, देवडी, देवमळा, धनकवडी, दिवे, एखतपूर, गुळुंचे, हरगुडे, गुन्होळी, हिवरे, जाधववाडी, जेजुरी, जवळार्जुन, जेऊर, काळदरी, काळेवाडी, कर्नलवाडी, खेंगरेवाडी, माहूर, माळशिरस, कोळविहिरे, मावडी कडेपठार, मावडी सुपे, मुंजवडी, नावी, नायगाव, नाझरे कडेपठार, निळंज, निरा शिवतक्रार, पांडेश्वर, पांगारे, पारगाव, परिंचे, पवारवाडी, पिंपरे खुर्द, पिसर्वे, पिसे, पिसुर्टी, पोंढे, राजेवाडी, रानमळा, रिसे, साकुर्डे, शिंदेवाडी, शिवरी, सिंगापूर, सोनोरी, तक्रारवाडी, टेकवडी, वनपुरी, वाल्हे, वाळुंज, झेंडेवाडी, वाघापूर, उदाची वाडी, तोंडल, थोपटेवाडी.
पुरंदर तालुक्यातील पूर्वी 37 गावे पीएमआरडीएच्या अखत्यारीत होती. मात्र, नंतर त्यापैकी 23 गावे ही एमएसआरडीसी'च्या अखत्यारीत समाविष्ट करण्यात आली आहेत. उर्वरित 15 गावे पीएमआरकडे होती. तालुक्यातील एकूण गावांपैकी उर्वरित 60 ते 65 गावे आता पीएमआरडीएच्या अखत्यारीत घेण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाला दिला होता. त्याबाबत पीएमआरडीएने सकारात्मक अहवाल दिला असून, त्याला लवकरच नगरविकास विभागाकडून मान्यता मिळेल, असं पुरंदर-हवेली आमदार विजय शिवतारे यांनी सांगितलं.