या देखाव्यात बेलबाग चौकापासून श्री दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंतचा संपूर्ण परिसर मिनिएचर स्वरूपात साकारण्यात आला आहे. लहान आकार असूनही त्यामधील प्रत्येक बारकावे, इमारतींचे डिझाइन, रंगसंगती आणि परिसराची रचना वास्तवदर्शी भासावी यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे. या मॉडेलमधील प्रत्येक इमारत हॅन्ड कटिंग पद्धतीने तयार केली असून रंगसंगती देखील पूर्णपणे हातानेच करण्यात आली आहे.
advertisement
बाप्पाच्या विसर्जनासाठी छ.संभाजीनगरमध्ये वाहतुकीत मोठे बदल, हे असतील पर्यायी मार्ग
या विशेष उपक्रमाबद्दल बोलताना सुनीता शिळीमकर यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आर्किटेक्चरल मॉडेल्स तयार केले आहेत. मात्र, गणेशोत्सवासाठी काही वेगळं करावं, हीच प्रेरणा घेऊन हा देखावा उभारला. प्रत्यक्ष बेलबाग चौक आणि मंदिर परिसराला भेट देऊन तेथील छायाचित्रे काढली. त्यानंतर त्यानुसारच संपूर्ण मॉडेलची आखणी करण्यात आली. लहान प्रतिकृती तयार करताना खूपच सूक्ष्मता आणि काळजी घ्यावी लागते. जवळपास 20 ते 25 जणांच्या मेहनतीतून हे काम फक्त 20 ते 25 दिवसांत पूर्ण झाले.
भाविकांसाठी हा देखावा म्हणजे एक वेगळा अनुभव आहे. मिनिएचर मॉडेलमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य एका वेगळ्याच पद्धतीने समोर येते. लहान आकार असूनही वास्तविकतेचा अनुभव देणारा हा देखावा पाहून भाविक आश्चर्यचकित होत आहेत. अनेकांनी या मॉडेलसमोर थांबून छायाचित्रे टिपली असून, सोशल मीडियावरदेखील या अनोख्या उपक्रमाची चर्चा रंगली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात विविध कलाकृती, सामाजिक संदेश आणि ऐतिहासिक घडामोडींवर आधारित देखावे पाहायला मिळतात. परंतु यंदा आर्किटेक्चरल शैलीतून साकारलेले हे मिनिएचर मॉडेल एक वेगळाच प्रयोग ठरला आहे. यामुळे पारंपरिक देखावे साकारण्याच्या पलीकडे जाऊन आधुनिक कल्पना आणि कलेच्या माध्यमातून गणेशभक्तांना नवा अनुभव मिळाला आहे.
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी हा देखावा नक्कीच आकर्षणाचा विषय ठरत असून, कलाकारांची मेहनत आणि कल्पकता याबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.