पुणे, 10 नोव्हेंबर : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज भेट झाली होती. ही भेट आज पुण्यात प्रतापराव पवार यांच्या घरी झाली होती. शरद पवार पोहोचल्यानंतर जवळपास अर्धा तास अजित पवार तिथेच होते. या भेटीनंतर अजितदादा हे दिल्लीला रवाना झाले आहे.
advertisement
शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांचं पुण्यातील बाणेर परिसरात निवास्थान आहे. आज दुपारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे या प्रतापराव पवार यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी अजित पवार सुद्धा हजर होते. विशेष म्हणजे, दरवर्षी गोविंदबागेमध्ये पाडव्याचा निमित्ताने पवार कुटुंबीयांची दिवाळी ही एकत्र होत असते. पण यावेळी घरातच दोन गट निर्माण झाल्यामुळे गोविंदबागेत पाडव्याला कोण कोण असणार याची उत्सुकता वाढली आहे.
शरद पवार आल्यानंतर अजितदादा हे अर्धा तास घरीच होते. त्यानंतर अजितदादा हे प्रतापराव पवार यांच्या घरातून बाहेर पडले. अजितदादा आता दिल्लीला रवाना होणार आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अजित पवार दिल्लीत जात असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल हे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह भाजपच्या वरीष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे. पण शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीत येत असल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
अजितदादा गोविंदबागेत पाडव्याला राहणार गैरहजर
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूचं निदान झालं होतं, तेव्हापासून अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमापासून लांब आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही गैरहजर राहत आहेत. दोनच दिवसांपूर्वी बारामतीमधल्या पवार कुटुंबियांच्या पाडवा कार्यक्रमालाही अजित पवार हजर राहणार नसल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर केलं आहे. पक्ष फुटीच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेतला पाडवा यावेळी अजित पवारांच्या गैरहजेरीत पार पडणार आहे. अजित पवार गोविंद बागेत पवार कुटुंबाच्या दिवाळीत उपस्थित राहणार नसल्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची भाऊबीज होण्याची शक्यताही कमी झाली आहे. याआधी राखी पौर्णिमेलाही सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना राखी बांधली नव्हती.
‘गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही. परंतु माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो’, अशी पोस्ट अजित पवारांनी केली आहे.
