बारामती येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने अजित दादांच्या काही महत्त्वाच्या सभा होत्या. मात्र, विमानतळावर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि भीषण स्फोट होऊन विमानाने पेट घेतला. या आगीत अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि दोन्ही वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला.
या विमानाचे सारथ्य करत होते अनुभवी कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक
advertisement
कॅप्टन शांभवी पाठक
अवघ्या काही वर्षांच्या कारकिर्दीत शांभवी यांनी आकाशात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. सैन्य दलाची पार्श्वभूमी असलेल्या शांभवी यांचे वडील लष्करात अधिकारी आहेत. एअर फोर्स बाल भारती स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्समध्ये पदवी घेतली होती. न्यूझीलंडमधून व्यावसायिक वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्या शांभवी यांना एव्हिएशन क्षेत्रातील एक उगवता तारा मानले जात होते.
कॅप्टन सुमित कपूर (Pilot-in-Command)
तब्बल 16,000 तासांहून अधिक उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या कॅप्टन सुमित कपूर यांच्याकडे या विमानाची धुरा होती. सहारा, जेट एअरवेज सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेले कपूर हे या क्षेत्रातील दिग्गज मानले जात होते. त्यांचा मुलगाही याच कंपनीत वैमानिक आहे, यावरून त्यांचे या क्षेत्राशी असलेले घट्ट नाते लक्षात येते.
अपघाताचे कारण काय?
'व्हीएसआर एव्हिएशन'चे वरिष्ठ अधिकारी व्ही. के. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानामध्ये कोणताही तांत्रिक दोष नव्हता. प्राथमिक अंदाजानुसार, कमी दृश्यमानता (Low Visibility) हे अपघाताचे मुख्य कारण असू शकते. वैमानिकांनी एकदा लँडिंगचा प्रयत्न केला, पण रनवे दिसत नसल्याने त्यांनी पुन्हा विमान वर घेतले (Missed Approach). दुसऱ्यांदा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला.
अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक धडाडीचा आणि प्रशासनावर पकड असलेला नेता गमावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. राज्य सरकारने या दुःखद घटनेमुळे तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. माणसाचे आयुष्य किती क्षणभंगुर असते, याची प्रचिती या घटनेने पुन्हा एकदा दिली. नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक, पण या अपघाताने बारामतीचा 'दादा' आणि आकाशाला गवसणी घालणारे दोन निष्णात वैमानिक कायमचे हिरावून नेले.
