नेमकी घटना काय?
आळंदी येथील 'अलंकापुरी मंगल कार्यालयात' २२ ऑक्टोबर २०२५ रोजी हा विवाह सोहळा पार पडला होता. प्रमोद अभिमन्यू केकाण (रा. डाळज नं. २, इंदापूर) याचे वय लग्नासाठी कायदेशीररीत्या आवश्यक असलेले 21 वर्षे पूर्ण नव्हते. मात्र, लग्न करण्याच्या उद्देशाने त्याने शाळा सोडल्याचा दाखला आणि आधारकार्डवर वयाची खाडाखोड करून बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे त्याने मुलीच्या वडिलांची आणि मंगल कार्यालय प्रशासनाची दिशाभूल केली.
advertisement
फसवणूक आणि कायदेशीर कारवाई:
याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील मुलीच्या ४८ वर्षीय वडिलांनी तक्रार दिली आहे. बनावट दाखल्यांच्या आधारे आरोपीने आपल्या मुलीशी लग्न करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर आळंदी पोलिसांनी प्रमोद अभिमन्यू केकाण आणि त्याला मदत करणारा विशाल सुभाष डोईफोडे या दोघांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ (२), ३३६ (३), ३४० (२) आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कलम १० व ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भारतात विवाहासाठी मुलाचे वय किमान २१ वर्षे आणि मुलीचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा (२००६) या कायद्यानुसार बालविवाह करणे, त्यात सहभागी होणे किंवा त्यासाठी चिथावणी देणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यामध्ये २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि १ लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
