गणेशोत्सवा दरम्यान पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आणि रस्ते बंदोबस्त यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. याचा फटका विशेषत: शहराच्या पश्चिम भागाशी जोडलेल्या भागातील रहिवाशांना बसतो. भिडे पूल हे या परिसरातील दुचाकी वाहतुकीसाठी महत्त्वाचे जोडणारे ठिकाण आहे. त्यामुळे पूल खुला करण्याच्या निर्णयामुळे हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
सदाशिव पेठ आणि डेक्कन मेट्रो स्थानक दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाअंतर्गत भिडे पुलावर पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
शहरात येत्या 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीची सोय व्हावी आणि नागरिकांना गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने महामेट्रोला पूल तात्पुरता खुला करण्याचे निर्देश दिले. यानुसार 20 ऑगस्टपासून 20 दिवसांसाठी भिडे पूल वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. मात्र, या कालावधीत पादचारी पूल उभारणीचे काम पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे.
महामेट्रोकडून सांगण्यात आले की, गणेशोत्सव संपल्यानंतर पुन्हा काम सुरू केले जाईल. पूल सुरक्षिततेची सर्व तपासणी करूनच तो खुला केला जाणार आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीने पुलावरील वाहतूक व्यवस्थापन केले जाईल.






