रोहन चौधरी असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे. तर सुनीता चौधरी असं सासूचं नाव आहे. पोलिसांनी सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सासू सुनीता चौधरी या भाजपच्या माजी सरपंच आहेत. राजकीय क्षेत्रात सक्रीय असताना देखील त्यांनी आपल्या सुनेचा अमानुष छळ केला आहे. दीप्ती मगर-चौधरी असं आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचं नाव आहे.
advertisement
नेमकी घटना काय?
दीप्ती यांचा विवाह २०१९ मध्ये सोरतापवाडी येथील रोहन चौधरी याच्याशी झाला होता. लग्नावेळी दीप्तीच्या माहेरच्यांनी ५० तोळे सोने आणि मोठ्या प्रमाणावर हुंडा दिला होता. लग्नानंतर काही काळ ठीक गेल्यानंतर दीप्तीचा छळ सुरू झाला. ती दिसायला सुंदर नाही, तिला घरातील कामे येत नाहीत, असा जाच करत तिच्या चारित्रावर संशय घेतला जाऊ लागला.
मुलीचा संसार सुखाचा व्हावा, या भावनेतून तिच्या वडिलांनी सासरच्यांना एकदा १० लाख रुपये रोख आणि त्यानंतर कार घेण्यासाठी २५ लाख रुपये देखील दिले होते. मात्र, इतकी मोठी रक्कम देऊनही सासरच्यांची हाव मिटली नाही आणि छळ सुरूच राहिला.
चिमुरडीसमोर संपवले आयुष्य
सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी रात्री दीप्ती यांनी राहत्या घरी गळफास घेतला. अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, ज्यावेळी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, त्यावेळी त्यांची ३ वर्षांची मुलगी तिथेच उपस्थित होती. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पतीसह सासूला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
