पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बॉलर पबच्या बाहेर रविवारी संध्याकाळच्या सुमारास मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पाकिस्तानी गायकाला या पबमध्ये कार्यक्रमासाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळताच काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. पबबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले अन् त्यांनी घोषणाबाजी करत पब प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला.
advertisement
संध्याकाळी उशिरा या पबमध्ये खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पाकिस्तानी गायकाला निमंत्रित करण्यात आले असल्याची चर्चा पसरली. यानंतर काही संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला. "भारतावर हल्ले करणाऱ्या पाकिस्तानमधील गायकांना येथे बोलावून कार्यक्रम घेणे देशद्रोहासमान आहे," असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी पबबाहेर निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले.
कोणताही अनुचित प्रकार नाही
याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आयोजकांकडून विचारपूस केली असून कार्यक्रमाची परवानगी, गायकाचा सहभाग आणि संपूर्ण पार्श्वभूमी याबाबत तपास सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तीव्र आंदोलनाचा इशारा
दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांनी पुढील काळात अशा प्रकारे पाकिस्तानी कलाकारांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरासारख्या संवेदनशील भागात अशा घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देखील देण्यात आला. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजची सत्यता तपासण्याचे आवाहन केले आहे.
शिवसेनेकडून राज्यभर आंदोलनाची हाक
आशिया कप करंडक स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान यांच्यात रविवारी लढत होत आहे. पहलगाम हल्ला आणि त्यानंकर भारताने पाकिस्तान विरोधात राबविले ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदात उभय संघांमध्ये क्रिकेटचा सामना होत असल्याने त्याची जोरदार चर्चा आहे. ज्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या त्या देशाच्या संघाबरोबर भारताने खेळू नये, अशी भूमिका अनेक जण मांडत आहे. त्यामुळे आज शिवसेनेकडून राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुसरीकडे दिल्लीमध्ये शिवसेनेला आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली नाही. राज्यामध्ये मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.