या शैक्षणिक वर्षात पुणे जिल्ह्यातील जवळपास 700 विद्यार्थ्यांनी आपल्या नाव, आडनाव, स्पेलिंग किंवा जन्मतारखेमधील चुका सुधारण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. बहुतेक प्रकरणे प्राथमिक शाळांमधील असून ती पालकांकडून दिलेल्या तपशिलातील तफावत आणि नोंदणीतील लेखनचूक यामुळे झाल्याचे समोर आले आहे.
परीक्षा-अभ्यासक्रम नाही, 'ही' शाळा देतेय कॉन्सेप्ट-बेस शिक्षण! पाहा या शिक्षण पद्धतीत काय खास
advertisement
रेकॉर्डमध्ये चुका होण्याची प्रमुख कारणे
शाळेत प्रवेश घेताना पालकांकडून दिलेली माहिती आणि जन्मदाखल्यातील तपशील यात विसंगती असणे ही सर्वात मोठी समस्या आहे. अनेकदा नावे इंग्रजीत आणि मराठीत लिहिताना स्पेलिंगमध्ये फरक पडतो. काही वेळा शैक्षणिक नोंदणी ऑनलाईन करताना तांत्रिक त्रुटी होतात. म्हणूनच शाळांनी आणि पालकांनी प्रवेशाच्या वेळी दिलेल्या माहितीची तपासणी अत्यंत काळजीपूर्वक करावी, अशी सूचना शिक्षण विभागाने केली आहे.
दुरुस्तीची अधिकृत प्रक्रिया कशी?
काहीही त्रुटी आढळल्यास पालकांनी सर्वप्रथम शाळेकडे लेखी अर्ज सादर करावा. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक असते:
विद्यार्थ्याचा जन्मदाखला
पालकांचे ओळखपत्र (आधारकार्ड/पॅन/इतर)
शालेय रेकॉर्डची प्रत
दुरुस्ती करावयाच्या तपशीलांची माहिती
शाळेचा प्रस्ताव
मुख्याध्यापक संबंधित नोंदींची पडताळणी करून प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी किंवा उपशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवतात. प्राथमिक शाळांमधील बदलांना गटशिक्षणाधिकारी तर माध्यमिक स्तरावरील बदलांना उपशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी मंजुरी देतात. मंजुरी मिळाल्यावर शाळा अधिकृतपणे रेकॉर्डमध्ये सुधारणा नोंदवते.
दहावीनंतर बदल करणे शक्य
एसएससी बोर्डाचे गुणपत्रक हे कायदेशीरदृष्ट्या अंतिम रेकॉर्ड मानले जाते. म्हणजेच दहावीत विद्यार्थ्याचे नाव, आडनाव किंवा जन्मतारीख जशी नोंदवली जाते, ती नंतर जवळपास सर्व सरकारी कागदपत्रांसाठी आधार ठरते. तरीही दहावीनंतरही बदल करण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे, मात्र ती अधिक गुंतागुंतीची आहे.
नाव किंवा जन्मतारखेतील बदलासाठी:
अॅफिडेव्हिट तयार करणे.
सरकारी राजपत्रात (Gazette) नाव/तपशील जाहीर करणे.
त्यानंतर बोर्ड, कॉलेज किंवा संबंधित सरकारी कार्यालयांकडे स्वतंत्र अर्ज करणे.
शिक्षण विभागाने पालकांना प्रवेश प्रक्रिया आणि नोंदणी करताना पूर्ण काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. लहानशा चुकांमुळे मुलांच्या भविष्यात अनावश्यक अडथळे निर्माण होऊ शकतात. वेळेत दुरुस्ती करून घेतल्यास सर्व शैक्षणिक आणि सरकारी प्रक्रियेत सुसूत्रता राहते. त्यामुळे होणारा त्रास आणि अडचणी टाळता येऊ शकतात.






