कुंभारवाडा ही पुण्यातील जुनी आणि प्रसिद्ध बाजारपेठ आहे. बाजीराव पेशव्यांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या या वाड्यात मातीपासून विविध वस्तू तयार करण्याचा व्यवसाय पिढ्यान्पिढ्या चालत आला आहे. आजही अनेक कुटुंब पारंपरिक पद्धतीने मातीच्या वस्तू, कुंड्या, दिवे तसेच सणानुसार लागणारे साहित्य तयार करत आहेत. येथे मिळणाऱ्या वस्तू होलसेल दरात उपलब्ध होत असल्याने ग्राहकांची मोठी पसंती या बाजारपेठेला मिळते. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे विविध भागांतून ग्राहक येथे खरेदीसाठी येतात.
advertisement
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर कुंभार व्यवसायिक गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून खण आणि कुंड्यांचे उत्पादन करत आहेत. यंदा उत्पादनाचे प्रमाण वाढले असले तरी अपेक्षित मागणी नसल्याची खंत व्यवसायिक व्यक्त करत आहेत. खण हे झिरो खण, रेग्युलर आणि मोठा खण अशा तीन प्रकारांत उपलब्ध आहेत. एक खण साधारण 25 रुपयांपासून सुरू होतो, तर शेकडा 500 रुपयांप्रमाणे विक्री केली जाते. विविध आकार आणि प्रकारांमुळे ग्राहकांना निवडीचे पर्याय उपलब्ध आहेत. यंदा माती, इंधन आणि मजुरीचा खर्च वाढल्याने खण तसेच कुंड्यांच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत.
वाढलेल्या किमतींमुळे अनेक ग्राहक खरेदीसाठी मागे हटत असल्याचे व्यवसायिकांचे म्हणणे आहे. हा व्यवसाय आमच्या पिढ्यान्पिढ्या चालत आला आहे. उत्पादन भरपूर आहे, पण मागणी कमी असल्याने चिंता वाढली आहे, अशा भावना कुंभार वाड्यातील व्यवसायिकांनी व्यक्त केल्या. परंपरा आणि संस्कृती जपणारा हा व्यवसाय टिकून राहावा, यासाठी ग्राहकांनी स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा कुंभार व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.