पुण्यातील राष्ट्र प्रथम ट्रस्ट आणि सदैव फाउंडेशनच्या वतीने ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरात शिकणाऱ्या विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉक आणि गणपती दर्शनाचा उपक्रम घेण्यात आला. पुणे शहरातील 500 हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर येथून हेरिटेज वॉकची सुरुवात करण्यात आली. त्रिशुंड गणपतीचे दर्शन घेऊन परदेशी विद्यार्थ्यांनी या मंदिराचा इतिहास जाणून घेतला.
advertisement
श्री शिवाजी राजे मर्दानी आखाडा यांचेकडून मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक परदेशी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.पुणे शहराचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती उत्सव मंडपात गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांनी मूळ मंदिराचा इतिहास जाणून घेतला. भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी भाऊसाहेब रंगारी भवन आणि स्वातंत्र्य लढ्याची चळवळ जाणून घेतली. त्यानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची भव्यता अनुभवत आरती केली.
या देशातील विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
परदेशी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जगभरातील विविध देशातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, युगांडा, म्यानमार, नेपाळ, भूतान, कझाकिस्थान या देशातील जवळपास 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.





