देवतळे कुटुंबीयांनी सांगितले की, या देखाव्यात मत्स्य, कूर्म, वाराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे सर्व अवतार सुंदर कलाकृतींच्या माध्यमातून साकारले गेले आहेत. प्रत्येक अवताराची वैशिष्ट्ये आणि त्यामागील पुराणकथांचा संदर्भ लक्षात घेऊन सजावट करण्यात आली आहे. या देखाव्यात मत्स्य अवतारापासून ते भविष्यकाळातील कल्की अवतारापर्यंतचा प्रवास दाखवला आहे.
advertisement
निलम देवतळे यांनी सांगितले की, या उपक्रमामागचा खरा हेतू म्हणजे तरुण पिढीला आपल्या पुराणकथा आणि संस्कृतीची ओळख करून देणे. विष्णूंचे प्रत्येक अवतार मानवजातीच्या उत्क्रांतीची कथा सांगतो. जलचरातून स्थलचर, मग नरसिंह म्हणजे अर्धमानव-अर्धप्राणी आणि नंतर पूर्ण मानव, अशा टप्प्यांतून जीवन कसे बदलले हे यातून समजते. या देखाव्याद्वारे केवळ भक्तीच नाही तर ज्ञान आणि विज्ञानाचा दुवा जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
देवतळे कुटुंबीयांनी सांगितले की, हा देखावा तयार करण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागला. विशेष म्हणजे, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून हा देखावा साकारण्यात आला आहे. प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला असून, थर्माकोलऐवजी कागद, कापड, लाकूड आणि मातीचा उपयोग करण्यात आला आहे. देखावा हालता (moving) असून, प्रत्येक अवतारासाठी स्वतंत्र पार्श्वभूमी आणि लाइटिंग केली आहे, ज्यामुळे तो अधिक आकर्षक वाटतो.
गणेशोत्सव हा फक्त उत्सव नसून तो आपल्या परंपरा, कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणारा सोहळा आहे. अशा देखाव्यांमधून भाविकांना केवळ मनोरंजन नाही तर माहितीही मिळते. त्यामुळे देवतळे कुटुंबीयांचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.
निलम देवतळे म्हणाल्या, दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर देखावे करतो. यावर्षी ‘दशावतार’ या विषयावर काम करण्याची प्रेरणा मिळाली कारण यामधून आपण मानवजातीच्या प्रगतीची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची कथा सांगू शकतो.