राज्यात एकूण 2 हजार 997 मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 91.35 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. यापैकी 114 धरणे शंभर टक्के भरली असून, उर्वरित धरणांमध्येही पुरेसा जलसाठा आहे. फक्त पाच धरणांमध्येच पाणीसाठा 0 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान आहे. यंदा झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये मुबलक जलसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात राज्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
एसटीवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न! गेल्या अनेक वर्षांतील उत्पन्नाचा विक्रम मोडला, दिवाळीत किती कमाई?
0 ते 10 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असलेली धरणे
राज्यात असलेल्या एकूण 2 हजार 997 मोठे, मध्यम, लघु प्रकल्पांपैकी काही धरणांमध्ये 0 ते 10 टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील बोरगाव अंजनपूर, नांदेड जिल्ह्यातील दिमडी आणि किनवट (मंगरूळ) तसेच पुणे जिल्ह्यातील लोणावळा टाटा या धरणांमध्ये अतिशय कमी म्हणजेच 10 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.
कोणत्या विभागात किती पाणी?
राज्यातील धरणांचा पाणीसाठा विभागानुसार पाहता, नागपूर विभागामध्ये सध्या 89.69% पाणीसाठा आहे, जो मागील वर्षीच्या 85.39% पेक्षा जास्त आहे. अमरावती विभागामध्ये सध्या 91.46% पाणी आहे, जे मागील वर्षीच्या 91.78% च्या तुलनेत थोडे कमी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पाणीसाठा 88.89% असून, मागील वर्षी तो 77.89% होता. नाशिक विभागामध्ये 88.89% पाणी साठले आहे, मागील वर्षी 84.57% साठा होता. पुणे विभागामध्ये सध्या 93.68% पाणीसाठा आहे, मागील वर्षी 91.75% होता. तर कोकण विभागामध्ये सध्या 91.93% पाणीसाठा असून, मागील वर्षी तो 94.27% होता. राज्यातील एकूण पाणीसाठा सध्या 91.31% असून, मागील वर्षी तो 87.72% होता.