एसटीवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न! गेल्या अनेक वर्षांतील उत्पन्नाचा विक्रम मोडला, दिवाळीत किती कमाई?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
ST Bus: दिवाळीत अनेकजण गावी जाण्यासाठी लालपरीने प्रवास करतात. यंदा प्रवाशांची संख्या वाढली असून एसटीने उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.
पुणे : दिवाळी सणानिमित्त अनेक नागरिक गावी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) 15 ते 18 ऑक्टोबर या चार दिवसांत पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या तीन स्थानकांवरून बसच्या सहा हजार फेऱ्या पूर्ण केल्या. या फेऱ्यांमुळे सुमारे अडीच लाख प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे 6 कोटी रुपये जमा झाले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत 2.10 कोटी रुपये जास्त आहे.
दिवाळी सणासाठी एसटी बससेवा
दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) या स्थानकांमधून 589 अतिरिक्त फेऱ्या राबवल्या. त्यामुळे 15 ते 18 ऑक्टोबर या चार दिवसांत एकूण सहा हजार फेऱ्या पूर्ण झाल्या. अडीच लाखाहून अधिक प्रवाशांनी या कालावधीत बससेवा वापरली. विशेषत: वाकडेवाडी बस स्थानकावरून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव आणि परभणीसाठी 900 फेऱ्यांची वाढ करण्यात आली.
advertisement
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फेऱ्यांमध्ये मोठी वाढ
गेल्या वर्षी वाकडेवाडी (शिवाजीनगर) स्थानकावरून 600 फेऱ्या होत्या, तर यावर्षी प्रवाशांच्या मागणीच्या आधारे 900 फेऱ्या करण्यात आल्या. स्वारगेट स्थानकावरून यंदा 750 फेऱ्या झाल्या आहेत. मागील वर्षी येथे फक्त 450 फेऱ्या होत्या. या स्थानकातून कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगलीकडे बस सेवा चालवली जाते. वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) स्थानकातूनही नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर तसेच मराठवाड्यातील बीड, जालना, परभणी, जिंतूर, अंबाजोगाई, माजलगाव, हिंगोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये 650 पेक्षा अधिक फेऱ्या राबवल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीच्या आधारे फेऱ्या वाढवल्या असल्याचे पुणे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं.
advertisement
पुणे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं की, दिवाळी सणानिमित्त दरवाढ न करता अतिरिक्त 589 गाड्या राबवल्याने प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विशेषत: खासगी वाहतूक करणाऱ्यांकडून अतिरिक्त दर आकारण्यात आल्याने प्रवाशांनी 'एसटी'ला प्राधान्य दिले आहे. यंदा स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) स्थानकांमधून फेऱ्या वाढवल्या आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 21, 2025 12:23 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
एसटीवर ‘लक्ष्मी’ प्रसन्न! गेल्या अनेक वर्षांतील उत्पन्नाचा विक्रम मोडला, दिवाळीत किती कमाई?