या चाचणी दरम्यान मेट्रो मार्गिकेवरील सुरक्षितता, वीज पुरवठा, आपत्कालीन ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक जिओमॅट्री आणि हाय-स्पीड दरम्यान होणारी हालचाल यांसारख्या तांत्रिक बाबींची सूक्ष्म तपासणी करण्यात आली. टाटा समूह आणि पीएमआरडीए यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या २३.३ किलोमीटरच्या उन्नत मार्गिकेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत १० हून अधिक मेट्रो रेक पुण्यात दाखल झाले असून, लवकरच उर्वरित २२ रेक देखील उपलब्ध होणार आहेत. विशेषतः गणेशखिंड रस्ता आणि विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ही मेट्रो सेवा मोठा आधार ठरणार आहे.
advertisement
पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पातील स्थानकांच्या इमारती, प्लॅटफॉर्म आणि प्रवाशांच्या सोयी-सुविधांची कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत बहुतांश स्थानके प्रवाशांसाठी खुली करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. हिंजवडीतील हजारो आयटी कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार असून, यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे हा प्रकल्प आता त्याच्या पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.
