मौलाना अस्लम रिजवी यांचे पूर्वज काही वर्षांपूर्वी इराणमधून भारतात आले आणि पुण्यात स्थायिक झाले. गेल्या सुमारे 30 वर्षांपासून मौलाना अस्लम पुण्यात राहत आहेत. त्यांनी सांगितले की, आम्ही शिया समाजातील आहोत. आमच्या समाजातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी इराण आणि इराक या दोन देशांमध्ये जातात. तेथील धार्मिक आणि शैक्षणिक वातावरण चांगले असल्यामुळे विविध देशांमधील विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी येतात.
advertisement
संकट गंभीर, तर पुणेकर खंबीर! दुबईत अडकलेल्या भारतीयांसाठी मोठा निर्णय, Video पाहून कराल कौतुक!
रिजवी यांच्या मते, इराण आणि इराकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये किमान 40 ते 50 देशांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तिथे आंतरराष्ट्रीय वातावरण असून विविध संस्कृतींचा संगम पाहायला मिळतो. तेथील वातावरण अतिशय सकारात्मक आणि शांततेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धार्मिक आणि इतर शिक्षण घेण्यासाठी ही ठिकाणे महत्त्वाची मानली जातात. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक कुटुंबांमध्ये चिंता वाढली आहे. सुरुवातीला हे युद्ध दोन ते तीन दिवसांत संपेल असे वाटत होते. परंतु, आता संघर्ष अधिक तीव्र होत चालला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पुणे शहरात अनेक इराणी नागरिक अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. व्यवसाय, शिक्षण आणि विविध कारणांसाठी ते येथे वास्तव्यास आहेत. मौलाना रिजवी यांच्या मते, पुण्यात राहणाऱ्या शिया समाजातील सुमारे 60 ते 70 टक्के लोक हे मूळचे इराणमधून आलेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थितीबद्दल त्यांना अधिक काळजी वाटत आहे.
भारत आणि इराणी संस्कृतीत साम्य
भारत आणि इराण या दोन्ही देशांच्या संस्कृतीमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. त्यामुळे भारतात राहणाऱ्या इराणी नागरिकांना येथे आपलेपणाची भावना जाणवते. आम्ही सध्या सुरू असलेले युद्ध लवकर संपावे आणि दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
या युद्धामुळे केवळ संबंधित देशांवरच नव्हे तर जगभरातील लोकांवर त्याचा परिणाम होत असून शांततेची गरज अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले.





