नेमकी घटना काय?
मस्तगड भागातील भवानीनगर येथे राहणारे सागर धानोरे हे शनिवार रात्रीपासून बेपत्ता होते. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र त्यांचा शोध घेत होते. रविवारी पहाटे अंबड ते मंठा चौफुली दरम्यान असलेल्या रस्त्यावर एक कार बराच वेळ संशयास्पद स्थितीत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कदीम जालना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारची तपासणी केली असता, ड्रायव्हिंग सीटवर सागर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी उजव्या बाजूने स्वतःच्या गळ्यावर गोळी झाडली होती, जी गोळी आरपार गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
सागर धानोरे हे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर यापूर्वी मारामारीसारखे काही गंभीर गुन्हे दाखल होते. घटनास्थळावरून पोलिसांनी एक देशी बनावटीचे (गावठी) पिस्तूल जप्त केले आहे. मात्र, सागर यांच्याकडे हे बेकायदेशीर पिस्तूल आले कुठून आणि त्यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप गूढ कायम आहे.
घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा केले आहेत. स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवला आहे. जरी सागर हे राजकीय घराण्यातील असले, तरी ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण आहे की व्यवसायातील वाद, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
