या खुनात दीपक गोरख जगताप (रा. राजेवाडी, ता. पुरंदर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. खून करून फरार झालेल्या आरोपीचं नाव सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर, मूळ रा. राहू, ता. दौंड) असं आहे, अशी माहिती जेजुरी पोलिसांनी दिली आहे. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.
प्रेमविवाह आणि धमकी
जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील दीपक जगताप याचा वाघापूर (ता. पुरंदर) येथील पायल अमोल कांबळे हिच्याशी एक महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांनी दीपक पत्नी पायलसह उरुळी कांचन येथे राहण्यास गेला. तो उरुळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करत होता. त्यांचा संसार महिनाभर सुरळीत सुरू होता.
advertisement
रस्त्यात अडवत 'पोलिसांनी' काढायला सांगितली गळ्यातील सोनसाखळी; पुण्यातील वृद्धासोबत पुढं विचित्र घडलं
मात्र, पायलचा पहिला प्रियकर सुशांत मापारी याला त्यांचं लग्न मान्य नव्हतं. त्याने सातत्याने दीपक आणि पायलच्या मोबाईलवर फोन तसेच व्हॉट्सअॅप कॉल करून 'मी पायलशी लग्न करणार होतो, तुम्ही दोघांनी लग्न का केलं?' असं म्हणत जीवे मारण्याची धमकी देत होता. दीपकने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली होती.
भेटायला बोलावून केला खून
दरम्यान, १३ डिसेंबर रोजी दीपक पत्नी पायलसह राजेवाडी येथे आला. पायलला घरी सोडून तो आरोपी सुशांतला भेटायला गेला. कारण सुशांत सतत फोन करून 'पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा आणि लग्नाचा वाद मिटवून टाकू' असं सांगत होता.
सुशांतने दीपकला माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात बोलावून घेतले. याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला. खून केल्यानंतर आरोपी कोयता घटनास्थळीच टाकून दुचाकीवरून पसार झाला. दीपक घरी न परतल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. त्यावेळी माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात दीपकचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. घटनास्थळी दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी पोलिसांना सापडल्या आहेत.
या खुनाबाबतची फिर्याद मयत दीपकचे मामा संतोष शेंडकर (रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील पुढील तपास करत आहेत.
