सन 1919 मध्ये टिळकांच्या समोरच मुंबईतील प्रसिद्ध सरदार गृह येथे ही प्रतिकृती तयार करण्यात आली होती. मुंबईचे सुप्रसिद्ध शिल्पकार लेले यांनी या प्रतिकृतीची निर्मिती केली होती. त्या काळात टिळक यांचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असायचे, दौरे व प्रवास सुरुच असायचा. तरीही त्यांनी शिल्पकार लेले यांना वेळ देत स्वतः समोर बसून पुतळा तयार करू दिला. या प्रक्रियेस तब्बल 6 ते 7 महिने लागले.
advertisement
या प्रतिकृतीच्या निर्मितीसाठी शाडू माती व पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) यांचा वापर करण्यात आला आहे. ही मूर्ती इतकी जिवंत आणि हुबेहूब आहे की टिळकांची वेशभूषा, मुद्रा, चेहऱ्यावरील भाव, त्यांची शैली सगळंच अगदी तंतोतंत उतरलेलं दिसतं. हा जगातला एकमेव पुतळा आहे जो टिळकांच्या समोर बसून बनवला गेला आहे. यापूर्वी असा कोणताही पुतळा अस्तित्वात नाही.
व्यंगचित्रकार शि.द. फडणीसांनी गाठली शंभरी, आयुष्यभर विनोदी रेषांमधून केलं सामाजिक भाष्य
टिळकांच्या निधनानंतर हा पुतळा अनेक वर्ष मुंबईतच होता. मूळ शिल्पकारांच्या घरात तो पिढ्यानपिढ्या सांभाळून ठेवण्यात आला होता. मात्र मुंबईच्या दमट हवामानामुळे या मूर्तीवर परिणाम होऊ लागल्यामुळे ती सुरक्षित ठेवण्यासाठी 2020 साली पुण्यात आणण्यात आली. सध्या ती टिळकांच्या वास्तव्याच्या टिळक वाड्यात, त्यांच्या अभ्यासिकेत जतन करून ठेवण्यात आली आहे.
टिळक वाड्यात त्यांच्या प्रतिकृतीसोबतच त्यांची वापरलेली खुर्ची, काठी, पगडी, पदत्राणे, पुस्तकं, त्यांचा वैयक्तिक पत्रसंच, 1912 सालचे वृत्तपत्र, ब्रिटिश काळातील टेबल लॅम्प, जुने घड्याळ अशा अनेक ऐतिहासिक वस्तू आजही पाहता येतात. या वास्तूला एक वेगळंच महत्त्व आहे कारण टिळक यांच्या घरी स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रानडे, गोपाळ कृष्ण गोखले यांसारखे थोर विचारवंतही येऊन गेले आहेत.
या दुर्मिळ मूर्तीचा इतिहास, त्यामागची शिल्पकलेची किमया आणि त्याचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व याबद्दल टिळक यांचे वंशज कुणाल टिळक यांनी माहिती दिली. त्यांच्यानुसार ही प्रतिकृती केवळ एक मूर्ती नाही, तर टिळकांच्या विचारांचा, त्यागाचा आणि लढ्याचा जिवंत पुरावा आहे. ही प्रतिकृती भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरावी, हाच या जतनामागचा उद्देश आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ही प्रतिकृती एक मौल्यवान ठेवा आहे, जी लोकमान्य टिळकांच्या तेजस्वी वारशाला अभिमानाने जपते.





