शरद पवारांना सोडलं नाही...
आंबेगावमधील कळंब येथे बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले की, काही लोकं विचारतात की तुम्ही पवार साहेबांना का सोडलं, पवार साहेबांना सोडायचा प्रश्नच येत नाही. बऱ्याच लोकांना बऱ्याच आतल्या गोष्टी माहीत नसतात असे त्यांनी म्हटले. वळसे पाटील यांनी पुढे म्हटले की, पक्षाच्या 54 आमदारांची बैठक बोलावली आणि त्यात सरकारमध्ये जाण्याची चर्चा झाली. आपण सरकारमध्ये जायचं ठरलं, दुसऱ्या पक्षात नाही. आपण कोणत्या पक्षात गेलो नाही, आपला पक्ष राष्ट्रवादी व चिन्ह घड्याळच असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
advertisement
दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हटले की, रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सत्तेत जाणं गरजेचं होतं. गेल्या दोन वर्षांत अजितदादा अर्थमंत्री असल्याने त्यांनी भरभरून पैसा दिला आणि आपली कामे झाली. राजकरणात अशा गोष्टी कधी कधी घडतात. एकदा आपण पुलोद स्थापन केला, एकदा काँगेस मधून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. तसं आज राजकरणात काही बदल झाला तर हा बदल परिस्थिती प्रमाणे हाताळायचा असतो असही वळसे पाटील यांनी पुढे सांगितलं.
आपण साहेबांचे शत्रू नाही...
दिलीप वळसे पाटील यांनी पुढे म्हटले की, याचा अर्थ लगेच आपण शरद पवार साहेबांचे शत्रू झालो, आणि ते आपले शत्रू झाले असं नाही. त्यांच्या बाबत प्रेम व आदर आजही आपल्यात आहे. पण विरोधकांकडे मुद्दे नाहीत, काही भांडवल नाही, बोलायला मुद्दे नाहीत म्हणून हे भावनिक मुद्दे मांडले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. मंत्रिमंडळात नसतो तर आपली एक-एक कोटींची कामे झाली नसती असेही त्यांनी म्हटले. माझ्या मतदार संघात कोणत्याही गावात जा 2-4 कोटींचा निधी आलाच आहे. मंचरला 85 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
