शिरुर विधानसभेची जागा जिंकण्यासाठी अजित पवार गटाने कंबर कसली आहे. विद्यमान आमदार अशोक पवार हे शरद पवार गटात आहेत. त्यांच्याविरोधात अजितदादा रिंगणात असणार असल्याची चर्चा होती. पण, आता अजित पवार यांनी अशोक पवारांविरोधात तगडा उमेदवार रिंगणात उतरवण्याचे निश्चित केले असल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे यांचे शिलेदार शिरूरचे शिवसेना नेते ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार हे बारामतीमधूनच निवडणूक लढवणार आहेत. तर, शिरुरमधून ज्ञानेश्वर कटके रिंगणात असण्याची शक्यता आहे.
advertisement
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर आबा कटके यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बारामतीत अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर आबा कटके यांचा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असणार आहे. या ठिकाणाहून विद्यमान आमदार अशोक पवार यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
