मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा देखावा साकारण्यासाठी तब्बल 22 कलाकारांनी जवळपास 15 दिवस मेहनत घेतली. बेंगळुरू येथून आलेल्या कलाकारांच्या टीमने अत्यंत बारकाईने मूळ मंदिरातील सूक्ष्म नक्षीकाम आणि वास्तुशैली जपली आहे. हा देखावा पाहताना भक्तांना जणू कर्नाटकातील सूर्य मंदिराचा प्रत्यक्ष अनुभव आल्यासारखे वाटते.
Ganeshotsav 2025: 108 किलो चांदीचा गणपतीला 2,00,00,000 रुपयांचं सोनं, मुंबईकरांवर जालनेकर ठरले भारी!
advertisement
रास्ता पेठ हा भाग पूर्वी दाक्षिणात्य समाजाच्या वस्तीमुळे प्रसिद्ध होता. त्याकाळी येथे तेलगू आणि मद्रासी व्यापाऱ्यांचा मोठा वावर होता. त्या समुदायातील एक प्रतिष्ठित व्यापारी नायडू यांच्या पुढाकाराने, परिसरातील मराठी, तेलगू आणि मद्रासी नागरिकांना एकत्र करून 1926 मध्ये या मंडळाची स्थापना झाली. याच कारणामुळे मंडळाला नायडू गणपती अशी ओळख मिळाली.
स्थापनेपासूनच मंडळाने शारदा गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा सुरू केली. महिलांच्या सक्रिय सहभागामुळे ही परंपरा अधिक दृढ झाली. दाक्षिणात्य संस्कृतीचा प्रभाव येथे आजही कायम असून, गणेशोत्सवात दाक्षिणात्य पारंपरिक पद्धतीने भजन आणि पंचआरतीचे आयोजन केले जाते.
मंडळाने गेल्या शंभर वर्षांत केवळ गणेशोत्सव मर्यादित ठेवला नाही, तर समाजोपयोगी उपक्रमांतही सक्रिय सहभाग घेतला आहे. अंध, अपंग आणि गरजूंसाठी भोजनदान, रक्तदान शिबिरे, वारकरी संप्रदायासाठी वारीदरम्यान अल्पोपहार, तसेच माघी गणेशोत्सवात महाप्रसाद यासारखे उपक्रम दरवर्षी आयोजित केले जातात.
याशिवाय, मंडळाच्या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची समृद्ध परंपरा आहे. गंगुबाई हंगल, पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांसारख्या दिग्गजांनी येथे शास्त्रीय संगीत सादर केले आहे. नाट्यसंगीत आणि नाट्यप्रयोगांमध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर, आशा खाडिलकर, डॉ. काशिनाथ घाणेकर यांनीही सहभाग नोंदवला होता. अलीकडच्या काळात एकपात्री प्रयोग, मेलडी ऑर्केस्ट्रा, लहान मुलांचे गुणदर्शन, क्रीडा स्पर्धा यासारखे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.
आज रास्ता पेठेत केवळ दाक्षिणात्य नव्हे, तर मराठी, गुजराती, मारवाडी, जैन समुदायांचाही मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे मंडळ सर्व हिंदू सण मोठ्या उत्साहात साजरे करते. गुढीपाडवा, होळी, जन्माष्टमी, नवरात्रीचे रास-गरबा, दीपोत्सव असे अनेक सण येथे मोठ्या उत्साहात साजरे होतात. शंभराव्या वर्षानिमित्त विशेष उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आकर्षक देखावे यांचा समावेश आहे.