पुणे : राज्य परिवहन महामंडळाची एकूण आठ एकर जमीनपैकी चार एकर पीएमपी प्रशासनाला हस्तांतरित केली जाणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पाठवलेल्या प्रस्तावास एसटी प्रशासनाने मंजुरी दिली असून, लवकरच ही जागा पीएमपीच्या ताब्यात येणार आहे. येथे मोठा आगार उभारला जाणार असून, अंदाजे 80 बस थांबू शकतील.
आळंदीमध्ये भाविकांसाठी नवीन बस आगार
advertisement
आळंदीमध्ये सध्या पीएमपीचे कोणतेही आगार नाही. येणाऱ्या भाविकांची संख्या खूप असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी येथे फक्त एक छोटा बस थांबा बांधण्यात आला आहे, जिथून दररोज सव्वाशे बसची वाहतूक होते. भाविकांसाठी सोयीची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पीएमपी प्रशासन काही दिवसांपासून नवीन आगारासाठी जागेच्या शोधात होते. यासाठी अध्यक्ष पंकज देवरे यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव नंतर विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातून राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला, आणि आता एसटी प्रशासनाने त्यास मंजुरी दिली आहे.
पीएमपीएमएल पुणे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, आळंदी हे एक मोठे तीर्थक्षेत्र असून राज्यभरातून दर्शनासाठी भाविक येथे येतात. आळंदीमध्ये सध्या आगार नसल्यामुळे पीएमपीच्या प्रवासी सेवेवर काही बंधने होती. मात्र आता एसटी प्रशासनाकडून चार एकर जमीन पीएमपी प्रशासनाला मिळणार आहे. या जागेवर मोठा बस आगार बांधला जाईल, ज्यामुळे प्रवाशांची सोय अधिक सुधारेल.
