लग्नाला न जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला
काळेवाडी येथील ज्योतीबानगर परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास एका ३६ वर्षीय व्यक्तीवर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्याचं कारण ऐकून पोलीसही चक्रावून गेले. हल्लेखोरांच्या नातेवाईकाच्या लग्नाला फिर्यादी उपस्थित राहिला नव्हता, केवळ याच क्षुल्लक गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी त्याला गाठलं. आरोपींनी त्या तरुणाला पकडून गळा दाबला, दांडक्याने बेदम मारहाण केली आणि शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणाने या हल्ल्यातून बचावल्यानंतर काळेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत पाच अज्ञात व्यक्तींविरोधात प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार दाखल केली आहे. काळेवाडी पोलीस या आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
advertisement
Pune News: काळोखात थांबलेल्या कारमध्ये 6 जण; फोनमध्ये आढळलं असं काही की लगेचच अटक
अपघाताच्या वादातून बस चालकाचा खून
दुसरी घटना काळेवाडी परिसरातच घडली, मात्र याची नोंद वाकड पोलीस ठाण्यात झाली आहे. सचिन धोंडीबा सोनकांबळे (वय २८) या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाला. सचिन हा चाकण येथे खासगी प्रवासी बस चालवण्याचे काम करत होता. त्याने यापूर्वी केलेल्या एका अपघाताच्या कारणावरून आरोपींनी त्याला लक्ष्य केलं. रागाच्या भरात आरोपींनी सचिनला अडवून कोणत्यातरी जड धारदार वस्तूने डोक्यात जोरदार मारहाण केली. यात त्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत सचिनच्या मोठ्या भावाने वाकड पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चाकणमधील अपघाताचा बदला घेण्यासाठीच सचिनची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, वाकड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
