Pune News: काळोखात थांबलेल्या कारमध्ये 6 जण; फोनमध्ये आढळलं असं काही की लगेचच अटक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पोलीस पथक खासगी वाहनातून संशयितांचा शोध घेत असताना, खंडाळा माथ्याजवळ नगर-पुणे हायवे रोडवरील एका हॉटेलसमोर त्यांची नजर एका गुजरात पासिंग असलेल्या व्हॅगनर गाडीवर पडली
रांजणगाव गणपती: पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती एमआयडीसी (MIDC) परिसरातील एका बंद पडलेल्या कंपनीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा संशयितांना रांजणगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य आणि वाहनासह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या सर्व सहा आरोपींची ओळख पटली असून, ते मूळचे गुजरात राज्यातील मोरबी येथील रहिवासी आहेत. सुरेशभाई प्रभूभाई धामेचा, जितेंद्र दिनेश डाभी, मेहुल सुरेशभाई धामेचा, भरतभाई देवजीभाई सोळंकी, उत्सव जितेंद्रभाई डाभी, आणि भरतभाई जिवराजभाई कोळी (सर्व रा. मोरबी-२, इंदिरानगर, डीव्हिजन, ता. जि. मोरबी, गुजरात) अशी आरोपींची नावं आहेत.
सुरक्षा रक्षकाच्या कॉलमुळे कारवाई
या कारवाईची सुरुवात मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता झाली. एमआयडीसीमधील संबंधित बंद कंपनीच्या सुरक्षारक्षकाने डायल ११२ क्रमांकावर कॉल करून काही संशयित हालचालींची माहिती दिली. या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
खासगी वाहनातून पाठलाग
पोलीस पथक खासगी वाहनातून संशयितांचा शोध घेत असताना, खंडाळा माथ्याजवळ नगर-पुणे हायवे रोडवरील एका हॉटेलसमोर त्यांची नजर एका गुजरात पासिंग असलेल्या व्हॅगनर गाडीवर पडली. गाडीतील संशयित पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलीस पथकाने जलद कारवाई करत या सहा संशयितांना ताब्यात घेतले.
advertisement
दरोड्याची कबुली आणि मुद्देमाल जप्त
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीत त्यांच्यापैकी एकाच्या मोबाईलमध्ये बंद पडलेल्या कंपनीचे फोटोही आढळले. आरोपींनी रांजणगाव एमआयडीसीमधील याच बंद कंपनीत चोरी करण्याच्या हेतूने आल्याची कबुली दिली.
या आरोपींकडून व्हॅगनर गाडी, दरोड्यासाठी लागणारे साहित्य (जसे की टिकाव, लोखंडी टोकदार चाकू आणि इतर साधने) आणि सहा मोबाईल फोन असा एकूण ३ लाख ४० हजार रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 13, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: काळोखात थांबलेल्या कारमध्ये 6 जण; फोनमध्ये आढळलं असं काही की लगेचच अटक









