नदी शुद्धीकरणासाठी प्रभावी उपाययोजनाची गरज
पवना नदीची लांबी 24.4 किमी, इंद्रायणी 20.6 किमी आणि मुळा नदीची लांबी 12.4 किमी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेने पवना नदीवर 25, इंद्रायणीवर 12, तर मुळा नदीवर 10 ठिकाणी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये पाण्याची तपासणी केली. तपासणीत नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खालावत असल्याचे आढळले आहे. रसायनांचे प्रमाण वाढणे, नाल्यांचे सांडपाणी मिसळणे आणि औद्योगिक उत्सर्जन हे मुख्य कारणीभूत घटक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
advertisement
काय आहे निष्कर्ष?
ऋतुमानानुसार करण्यात आलेल्या तपासणीत पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे स्पष्ट झाले. पवनामध्ये मिळणारे नाले आणि त्यातील प्रदूषित सांडपाणी हे प्रमुख कारण असल्याचे अहवालात नमूद आहे. त्याखालोखाल इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात असून ती औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने रसायनांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले.
शुद्धीकरणावर भर द्यावा
प्रक्रिया न झालेले सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी शहरातील नद्यांमध्ये थेट सोडले जात आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यास प्राधान्य देण्याऐवजी महापालिकेने नदी सुशोभीकरणाचा घाट घातला आहे. या दुर्लक्षामुळे नद्यांची ‘गटारगंगा’ होऊ लागली आहे. नद्यांना तातडीने पुनरुज्जीवन द्यावे, अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ धनंजय शेंडबाळे यांनी केली.