दोन वर्षांपूर्वीचे ते शब्द... आणि आजचं वास्तव
आजपासून बरोबर दोन वर्षांपूर्वी, राजकारणात जेव्हा मोठ्या घडामोडी घडत होत्या, तेव्हा शरद पवारांनी एक विधान केलं होतं, जे आज पुन्हा एकदा चर्चेत आलंय. "अजित पवार मुख्यमंत्री होणं हे स्वप्नच आहे. ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाही," असं रोकठोक मत पवारांनी मांडलं होतं. आज जेव्हा नियतीने दादांना आपल्यातून कायमचं हिरावून नेलंय, तेव्हा साहेबांचे ते शब्द एका वेगळ्या आणि क्रूर संदर्भाने खरे ठरले आहेत.
advertisement
साहेबांनी दिला होता 'शक्ती'चा दाखला
पवारांनी त्यावेळी या विधानामागचं कारण स्पष्ट करताना आर. आर. पाटलांचं उदाहरण दिलं होतं. "आर.आर. आबा म्हणायचे साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत. पण १० खासदार सोबत असताना पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणं जसं व्यवहार्य नाही, तसंच विधानसभेत १४५ आमदारांचं बळ पाठीशी नसेल, तर मुख्यमंत्रीपद हे केवळ 'दिवास्वप्न' ठरतं," असं शरद पवार म्हणाले होते. दादांना राजकारणातील वास्तव सांगताना वापरलेले ते कठोर शब्द आज नियतीच्या खेळात 'अंतिम' ठरले आहेत.
स्वप्न उराशी घेऊनच निरोप!
अजित दादांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा कधीच लपवून ठेवली नाही. "हो, मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल," असं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये उघडपणे सांगितलं होतं. बारामतीच्या लोकांच्या मनात तर ते कधीच मुख्यमंत्री होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं.
अधुरा प्रवास, कायमची शांतता
ज्या बारामतीने दादांना शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिलं, त्याच बारामतीच्या धावपट्टीवर दादांच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. साहेबांचे ते 'कठोर शब्द' आज केवळ राजकीय विश्लेषण न ठरता, एक दुःखद सत्य बनून समोर आले आहेत.
