अथर्व सुदामेला पीएमपीएलकडून आज तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अथर्वने एक इन्स्टाग्राम व्हिडिओ शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने पीएमपीएलच्या बस कंडक्टरचा ड्रेस वेअर केला होता. कंडक्टरच्या गणवेशात एक रिल तयार केला होता. तो व्हिडिओ त्याचा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अथर्वच्या रीलचा हेतू हा मनोरंजन इतकाच होता. पण आपण काय आणि कुठे करतोय? याचं भान आपल्याला असायला हवं. कारण पीएमपीएलच्या मालमत्तेचा वापर करताना पीएमपीएल प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, असं प्रशासनाचं म्हणणं आहे.
advertisement
पीएमपीएलने अथर्वला बजावलेल्या नोटिसीत काय म्हटलंय?
"आपण पुणे महानगर परिवहन महमहामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण, महामंडळाचा गणवेश, ई- मशिन आणि बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर करुन, परिवहन महामंडळाचे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड आणि प्रसारित केला. या प्रकरणी आपल्याला 02/01/2026 रोजी नोटीस बजावण्यात आली होती. आपणांस सदरील नोटीस प्राप्त दिनांकापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा पुणे महानगर परिवहन महामंडळ, मुख्य कार्यालय, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे 411037 येथे सादर करणेबाबत सुचित केले होते", असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
"पण अद्यापही आपला खुलासा परिवहन महामंडळाला दिलेल्या मुदतीत तुम्ही सादर केलेला नाही. परिवहन महमहामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण, महामंडळाचा गणवेश, ई मशिन आणि बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर केल्याने दोन रीलचे प्रत्येकी रक्कम 25,000/- रुपये प्रमाणे एकूण रक्कम 50,000/- रूपये इतकी रक्कम पुणे महानगर परिवहन महामंडळकडून दंड म्हणून आकारण्यात येत आहे. सदरची रक्कम त्वरीत महामंडळाकडे जमा करावी. दंड रक्कम प्राप्त न झाल्यास आपल्या विरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी", असं देखील या नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे. यानंतर आता अथर्व सुदामे काय भूमिका घेतो? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
