लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती परिसरात कॉलेज, नोकरी आणि व्यवसायासाठी अनेक नागरिक वास्तव्यास येत आहेत. यामुळे इथले बरेच घरमालक आपलं घर भाड्याने देतात. मात्र, घर भाड्याने देताना ते भाडेकरू बरोबर कोणताही करार न करता त्याला घर भाड्याने देत असल्याचं निदर्शनास येत आहे. घरमालकाने खासगी भाडेकरू ठेवताना किंवा नोकर भरती करताना संबंधितांची माहिती पोलिसांना देणं बंधनकारक असल्याचे पूर्वीच जारी करण्यात आलं आहे.
advertisement
याबाबत प्रसारमाध्यमांतून अनेकदा जनजागृतीही करण्यात आली होती. मात्र, तरीही अनेकजण हे करत नसल्याचं समोर येत आहे. आताच्या प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी दोन दिवसापूर्वी एका आरोपीकडून मॅफेड्रोन (MD.) पदार्थ जप्त केला. त्यानुसार तपासणी करत असताना पकडलेल्या आरोपीच्या पाषाणकर बाग येथील राहत्या घराची तपासणी केली असता, तो भाडेकरू असल्याचं समजलं. हा आरोपी राहात असलेल्या इमारतीमध्ये एकूण 17 भाडेकरू राहतात. मात्र, त्यांच्या माहितीची नोंद पोलिसांकडे न केल्यामुळे घरमालकावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या हद्दीतील भाडेकरू, हॉटेल, लॉजेस आणि गर्दीच्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.
