या प्रकरणी प्रशासक भास्कर पोळ याच्यासह सोसायटीचा अवसायक (Liquidator) विनोद माणिकराव देशमुख (वय ५०, रा. धायरी फाटा) या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनकवडीतील एकता सहकारी सोसायटीत ३२ नवीन सभासदांनी जुन्या सभासदांकडून समभाग खरेदी केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक झाली होती. तक्रारदार व्यावसायिक असून त्यांनी आणि अन्य नवीन सभासदांनी २०२३ मध्ये तत्कालीन प्रशासक पोळ याच्याकडे समभाग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. पोळ याने तक्रारदार सुनावणीसाठी उपलब्ध नसल्याचे कारण देत त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवला होता, तर इतरांचे अर्ज निकाली काढले होते.
advertisement
Pune News: चोरट्यांनी देवालाही नाही सोडलं; खंडोबा मंदिरात 35 लाखांची चोरी
सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदारांनी पुन्हा पोळ याची भेट घेऊन प्रमाणपत्राबद्दल विचारणा केली. तेव्हा पोळ याने तक्रारदारासह अन्य ३२ सभासदांना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतःसाठी आणि अवसायक विनोद देशमुख यांच्यासाठी तीन कोटी रुपयांची लाच मागितली. एवढेच नव्हे तर, भविष्यात सोसायटीच्या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत तक्रारदार सांगतील, त्या व्यक्तीस जागा मिळवून देऊ असे सांगून त्याने अतिरिक्त पाच कोटी रुपयांची मागणी केली होती.
पोळने लाचेचा पहिला हप्ता म्हणून ३० लाख रुपये मागितल्याची तक्रार व्यावसायिकाने एसीबीकडे केली. तांत्रिक पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी पोळ तक्रारदाराच्या शनिवार पेठेतील कार्यालयाजवळ लाच घेण्यासाठी आला. एसीबीच्या पथकाने सापळा रचून पोळ याला रंगेहाथ पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.
