पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर-चेलाडी उड्डाणपुलाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. रस्त्यावर अचानक खड्डा समोर आल्याने पुढे जाणाऱ्या कारचालकाने ब्रेक दाबला. त्यामागून येणाऱ्या कारचालकांना वेळेत गाडी थांबवता आली नाही आणि एकामागोमाग तीन कार एकमेकांवर आदळल्या. पुणे-सातारा महामार्ग हा महत्त्वाचा महामार्ग आहे. या महत्त्वाच्या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
खड्ड्यामुळे झालेल्या या भीषण अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, तिन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले पूल व महामार्ग इतक्या दर्जाहीन पद्धतीने का बांधले जातात? असा सवाल स्थानिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) दखल घेत नाही. देखभाल न केल्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचेही समोर आले आहे.
महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे रस्त्यांच्या गुणवत्तेवर आणि प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गावरील रस्त्यांच्या दूरवस्थेबाबत याआधीदेखील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर रील्स, पोस्टच्या माध्यमातून नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली.