या घटनेत फुटपाथवर बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. येरवड्यातील सादलबाबा दर्गा रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने सुरुवातीला रिक्षेला आणि काही दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट पदपथावर (फूटपाथ) शिरला. तिथे बसलेले सुशील निवृत्ती मोहिते (वय ४०) यांच्या अंगावरून टेम्पोचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मीनगर पोलिसांनी याप्रकरणी टेम्पो चालक आदम चाँद शेख (वय ६२) याला अटक केली आहे.
advertisement
नुकतंच मांजरीमधूनही एक भीषण अपघाताची घटना समोर आली होती. यात खासगी बसच्या धडकेत तरुणाचा अंत झाला. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी परिसरात शनिवारी पहाटे घडली. आदित्य शेळके (वय २०) हा तरुण आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी निघाला होता. जवळचा पेट्रोल पंप बंद असल्याने त्याने दुचाकी वळवली, त्याच वेळी मागून येणाऱ्या एका भरधाव खासगी बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात आदित्यचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र मनोहर रणशिंग हा जखमी झाला आहे. मांजरी पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरात वाढत्या वाहनसंख्येसोबतच चालकांचा बेजबाबदारपणा आणि अतिवेग यामुळे रस्ते मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत. पोलिसांनी अपघातांच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली असून गस्त वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
