एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपनीकडून ही नॉन-स्टॉप हवाई सेवा पुरविण्यात येणार आहे. ही सेवा आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध असेल – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार. पुण्याहून रात्री ९ वाजून १० मिनिटांनी हे विमान अबू धाबीसाठी उड्डाण करेल. डिसेंबर महिन्यात जर तुम्ही पुण्याहून अबू धाबीला प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर 27 डिसेंबरपर्यंत तुम्ही 15 ते 25 हजार रूपयांच्या तिकीट खर्चामध्ये हा प्रवास करू शकता.
advertisement
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, "पुणे विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नकाशावर हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. या थेट सेवेमुळे पुण्याचं आंतरराष्ट्रीय पदचिन्ह अधिक विस्तारेल."
हा नवीन आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग व्यावसायिक, उद्योजक, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच मध्य पूर्वेत नोकरीसाठी गेलेल्या कामगार वर्गाला मोठा दिलासा देणारा आहे. या थेट सेवेमुळे वेळेची बचत होईल आणि कनेक्टिंग फ्लाईट्सचा त्रास वाचेल. पुणे-अबू धाबी हे दोन्ही शहरं व्यापार आणि शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने, या सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. परदेशी गुंतवणूक, व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना अधिक चालना मिळण्यासाठी पुण्यातील व्यावसायिक, उद्योजक आणि नागरिकांकडून अबू धाबी विमानसेवा सुरू करण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती.
