Pune News : हृदयद्रावक! आईचा हात पकडून शाळेत निघालेला 5 वर्षाचा साई; वेगात बस आली अन् क्षणात सगळं संपलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रेखा भंगारे मुलाला शाळेत सोडण्यासाठी धनगरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्कूल बसने त्यांना जोरदार धडक दिली.
पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एका स्कूल बसने दिलेल्या धडकेत साईनाथ तुळशीराम भंगारे (वय ५) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई रेखा तुळशीराम भंगारे (वय २८) गंभीर जखमी झाल्या आहेत. मंगळवारी (२ नोव्हेंबर) सकाळी हा अपघात झाला.
या गंभीर घटनेप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी तातडीने कारवाई करत बसचालक संस्कार अनिल भोसले (रा. पांडवनगर, वडकी) याला अटक केली आहे. मात्र, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी केवळ चालकाविरुद्ध नव्हे, तर शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, बसमालक आणि चालक अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेखा भंगारे यांनी याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ उरुळी देवाची येथील एका शाळेत शिकत होता. मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रेखा भंगारे मुलाला शाळेत सोडण्यासाठी धनगरवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाल्या होत्या. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या स्कूल बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे साईनाथ थेट बसच्या चाकाखाली सापडल्याने तो जागीच ठार झाला, तर रेखा यांना गंभीर दुखापत झाली.
advertisement
अपघातानंतर नागरिकांनी दोघांनाही तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच साईनाथचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
view commentsया दुर्दैवी अपघातामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मृत साईनाथचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणून ठिय्या दिला. ही स्कूल बस ज्या शाळेची आहे, त्या शाळेचे प्रशासन, संस्थापक आणि बसचालक यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. या आक्रोशाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. सहायक निरीक्षक किशोर पवार अधिक तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 03, 2025 12:52 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : हृदयद्रावक! आईचा हात पकडून शाळेत निघालेला 5 वर्षाचा साई; वेगात बस आली अन् क्षणात सगळं संपलं


