वसंत मोरे यांनी ट्विटरवर पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. वसंत मोरे यांनी पुण्यात झालेल्या ड्रोन शोसाठी झालेला खर्च काढण्यासाठी त्याच कंपनीकडून कोटेशन मागवून घेतलं. त्यावेळी हे कोटेशन एक कोटी रुपये होतं. त्यानंतर वसंत मोरेंनी मंत्रिमहोदयांना पुण्यातील ससून रुग्णालयाची आठवण करून दिली आणि हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवर यावं असा सल्ला देखील दिला. त्यावर भाजपचे नगरसेवक सुशील मेंगडे टीका केली आहे. नेटकऱ्यांची टाईमपास पसंत म्हणजे आपला हा रोजचा वसंत असं म्हणत त्यांना सुनावले आहे.
advertisement
नेमंक काय म्हणाले भाजपचे सुशील मेंगडे?
वसंत, तुझं राजकारण म्हणजे सरळ सरळ अपयशाची शिडी. लोकसभेत उमेदवारी मिळाली तर डिपॉझिट जप्त, आमदारकीचं स्वप्न पाहिलंस पण तेही फसलं. स्वतःच्या पराभवांचा ढीग लपवता येत नाही म्हणून सोशल मीडियावर मोठ्या गप्पा मारून स्वतःला नेता समजणं हा तुझा छंद झालाय.
ड्रोन शो हा महाराष्ट्रातला पहिला, पुण्याचा अभिमान आणि हजारो पुणेकरांनी आनंद घेतलेला उपक्रम. देशभरातून त्याचं कौतुक झालं, पुण्याचं नाव उंचावलं. पण तुझ्यासारख्याचा त्यात फक्त जळफळाटच झाला. कारण पुणेकरांनी तुला वारंवार नाकारलंय, म्हणून स्वतःला “रिलेव्हंट” दाखवण्यासाठी फुकट विरोध करणं हा एकमेव पर्याय तुझ्याकडे उरलाय. ‘ड्रोनच शो’ चे यश तुझ्या सारख्या बैल बुद्धीला काय कळणार.. एकूणच पुणेकरांचे आवडते नेते मुरलीधर अण्णा यांच्या कामांची व्याप्ती आणि वेग पाहून तुझी मळमळ पुणेकरांना कळतीय.
पुणेकरांना तुझ्या गप्पा हसवण्यासाठी पुरेशा आहेत, पण गांभीर्याने घेण्यासारख्या अजिबात नाहीत. मीडियालाही हे माहित आहे की तुझ्या विधानांना “कॉमेडी बाईट” म्हणून TRP मिळतो. मुद्द्यांना वजन द्यायला तू पात्र नाहीस, म्हणून बातमी होते ती तुझ्या मतांमुळे नाही, तर तुझ्या विनोदी भूमिकेमुळे.
वसंत, पुणेकरांचा विश्वास जिंकून दाखव, आणि मग कधी मोठमोठ्या उपदेशांच्या गोष्टी कर. आणि मी तुला यानिमित्ताने एक आव्हान देतो – या वेळेला पुणे महानगरपालिका निवडणुकीत जिंकून दाखव. मग तुझा आम्ही जाहीर सत्कार शनिवारवाड्यावर करू. कारण पुण्याला माहितीये, नेटकऱ्यांची टाईमपास पसंत म्हणजे आपला हा रोजचा वसंत. तोपर्यंत तुझ्या फेसबुक पोस्ट्स पुण्यात टाईमपास जोक' म्हणूनच फिरणार आहेत.