दत्तात्रयला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी हाजी येथील तामकरवाडी येथे राहणारे दत्तात्रय वाघ हे त्यांची पत्नी स्नेहा हिच्यासोबत राहत आहेत. टाकळी हाजी येथे त्यांचे 'कुडांई मेन्स पार्लर' नावाचे सलून दुकान आहे. दोन महिन्यांपूर्वी दत्तात्रय आणि स्नेहा यांचा आळंदी येथे प्रेमविवाह झाला होता. मात्र, स्नेहाच्या नातेवाईकांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे स्नेहाचा मावसभाऊ रवींद्र गायकवाड आणि इतर नातेवाइकांनी दत्तात्रयला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. यासंदर्भात दत्तात्रयने यापूर्वीच पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
advertisement
लोखंडी कोयत्याने वार
आज दुपारी दत्तात्रय वाघ आपल्या सलूनमध्ये शटर बंद करून, आशुतोष भाकरे याचे केस कापत होते. त्याचवेळी अचानक दुकानाचे शटर उघडून जीवन रवींद्र गायकवाड, शारुख बाबू शेख (वय २६), आणि प्रशांत हनुमंत साठे (वय १९) हे तिघे दुकानात घुसले. त्यांनी येताच दुकानातील काचा फोडल्या आणि साहित्याची नासधूस करण्यास सुरुवात केली. यावेळी जीवन गायकवाड याने लोखंडी कोयत्याने दत्तात्रय वाघ याच्या डाव्या मनगटावर आणि पाठीवर गंभीर वार केले. दत्तात्रयला जीवे मारण्याची धमकी देऊन तिन्ही आरोपी मोटारसायकलवरून रांजणगावच्या दिशेने पळून निघाले.
आरोपींना पाठलाग करुन पकडलं
मात्र, हा सर्व प्रकार पाहून टाकळी हाजी येथील गावकऱ्यांनी आणि नागरिकांनी तात्काळ या आरोपींचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करून दोघा अनोळखी आरोपींना पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. पकडलेल्या आरोपींना टाकळी हाजी पोलीस चौकीत आणण्यात आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांची नावे शारुख शेख आणि प्रशांत साठे अशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी जीवन गायकवाडच्या मदतीने दत्तात्रय वाघवर हल्ला केल्याची कबुली दिली.