पुण्यातील सायबर फसवणुकीच्या घटना:
शेअर मार्केट आणि गुंतवणुकीचा सापळा: शिवाजीनगर येथील एका ५० वर्षीय महिलेला शेअर बाजारात मोठी कमाई करून देण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. सुरुवातीला नफा मिळाल्याचा बनाव करून चोरट्यांनी त्यांचा विश्वास जिंकला आणि त्यानंतर तब्बल ३१ लाख रुपये उकळले. बिबवेवाडीतील एका तरुणालाही अशाच प्रकारे साडेअकरा लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.
advertisement
ब्लॅकमेलिंग आणि कर्जाचे आमिष: भवानी पेठेतील एका २८ वर्षीय तरुणाला कर्ज हवे होते. चोरट्यांनी सोशल मीडियावरील जाहिरातीद्वारे त्याला गाठले. कर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून चोरट्यांनी त्याला धमकावण्यास सुरुवात केली आणि त्याच्याकडून ४१ लाख १९ हजार रुपये उकळले. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वर्क फ्रॉम होम आणि हॉटेल बुकिंग:
घरातून ऑनलाइन काम करून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून कोंढव्यात एका महिलेची १२ लाख ३४ हजारांची फसवणूक झाली. पाषाणमध्ये हॉटेल बुकिंगच्या नावाने पंचवटी परिसरातील एका महिलेला ६ लाख ११ हजारांचा चुना लावण्यात आला. तर, कात्रजमध्ये फेसबुक मार्केटिंगच्या नावाखाली गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून एका नागरिकाचे पावणेपाच लाख रुपये लांबवले.
पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तीने दिलेल्या गुंतवणुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका. तसेच, तातडीने कर्ज मिळवून देणाऱ्या बनावट अॅप्स किंवा जाहिरातींपासून सावध राहा. कोणतीही आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर संपर्क साधावा.
